Loksabha 2019 : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा

former chief minister digambar kamat may be going to BJP
former chief minister digambar kamat may be going to BJP

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मडगाव विधानसभा मतदारसंघातील विद्ममान आमदार दिगंबर कामत आज तातडीने दिल्लीला गेल्याने ते पुढील मुख्यमंत्री असतील अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सकाळी ते दिल्लीला रवाना झाले असून आपण व्यावसायिक कारणास्तव दिल्लीला जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मांद्रे मतदारसंघाचे तत्कालीन आमदार दयानंद सोपटे यांनी रात्री दिल्लीला जाताना हेच कारण दिले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आमदारकीचा राजीनामा देेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. कामत हेही भाजपमध्ये प्रवेश करतील आणि मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे सोपवले जाईल अशी चर्चा आहे. कामत यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्यासोबत काँग्रेसचे पाच आमदार असतील असेही सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची तब्येत काल पहाटे खालवल्यापासून भाजपने पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरु केला आहे. विधानसभेचे विद्यमान सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री व्हावे, असे पक्षाच्या नेत्यांना वाटते, विधीमंडळ गटातील बहुतेकांची पसंती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना आहे. सत्ताधारी आघाडीत सहभागी गोवा फॉरवर्डच्या तीन व तीन अपक्षांना ही दोन्ही नावे मान्य नसल्यामुळेच तिसऱ्या नावाचा विचार भाजपने चालवला आहे.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई हे विद्यमान सरकारमध्ये नगरनियोजनमंत्री आहेत. त्यांची पसंती कामत यांच्या नावाला असू शकते. घटक पक्षांची संमती मिळत असल्याने कामत यांचे नाव भाजपकडून पर्यायी नेतृत्वासाठी पुढे केले जाऊ शकते. मात्र कामत हे आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार की काँग्रेसमधील दोन तृतीयांश (पाच आमदार) आमदारांना घेऊन वेगळा गट स्थापन करणार हे समजू शकले नाही.

कामत हे सुरवातीला काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी ते नगरसेवक होते. भाजपचे सुरवातीला चार आमदार 1994 मध्ये निवडून आले तेव्हा त्यात कामत यांचा समावेश होता. पक्षात पर्रीकर यांच्यानंतर त्यांचा क्रमांक सर्वमान्य होता. त्यांनी 2005 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2007 ते 12 असे ते पाच वर्षे मुख्यमंत्री होते. 1994 पासून सलगपणे ते मडगाव मतदारसंघाचे विधासभेत प्रतिनिधीत्व करत आहेत. मुख्यमंत्री असताना आपला मोबाईल क्रमांक सार्वजनिक करून तक्रारींची स्वतः दखल घेणारे मुख्यमंत्री अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com