Loksabha 2019 : जयाप्रदा यांना भाषणादरम्यान कोसळले रडू...

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 एप्रिल 2019

प्रचारादरम्यान भाषण करताना जयाप्रदा अचानक रडू लागल्या. एवढेच नाही तर त्यांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले... आणि पुढचा काही वेळ त्यांना बोलताही आले नाही. यामुळे व्यासपीठावरील नेत्यांसह नागरिकही भावूक झाले.

रामपूर : उत्तरप्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार व अभिनेत्री जयाप्रदा यांना रडू आवरले नाही. संबंधित व्हिडिओ व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

प्रचारादरम्यान भाषण करताना जयाप्रदा अचानक रडू लागल्या. एवढेच नाही तर त्यांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले... आणि पुढचा काही वेळ त्यांना बोलताही आले नाही. यामुळे व्यासपीठावरील नेत्यांसह नागरिकही भावूक झाले. उत्तरप्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जासोबतच पक्षाच्या उमेदवारांचे एकमेकांवर शाब्दिक हल्लेही सुरू झाले आहेत.

जयाप्रदा म्हणाल्या, 'मला रामपूर सोडायचे नव्हते. कारण इथे चांगले काम करणाऱ्या गरीब लोकांना दाबले जाते. जे लोक आझम खान यांच्याविरोधात काम करत होते त्यांना तुरुंगात टाकले जात होते. मी सक्रीय राजकारणापासून आणि रामपूर सोडून गेले कारण माझ्यावर ऍसिड हल्ला करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. माझ्यावर हल्लाही करण्यात आला.' हे बोलत असतानाच जयाप्रदा यांना रडू कोसळले.

दरम्यान, 1994 मध्ये एन टी रामाराम यांच्या तेलगुदेशम पार्टीसोबत जयाप्रदा यांचा राजकीय प्रवास सुरु झाला होता. आंध्रप्रदेशमधून त्या राज्यसभेच्या खासदार म्हणून संसदेत गेल्या. उत्तर प्रदेशाच्या सक्रीय राजकारणात आल्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षाचा हात धरला. 2004 आणि 2009 मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकीटावर त्या खासदार म्हणून निवडून आल्या. 2011 साली त्या अमर सिंह यांच्या 'राष्ट्रीय लोकमंच' या पक्षात सहभागी झाल्या. 2014 मध्ये आरएलडीच्या तिकीटावर त्यांनी बिजनौरमधून निवडणूक लढली. परंतु, यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. भाजपा हा त्यांचा पाचवा पक्ष ठरला असून, सध्या त्या आझम खान यांना रामपूर लोकसभा मतदारसंघातून थेट आव्हान देत आहेत.

Web Title: Jaya Prada breaks down in Rampur rally while recalling attacks by Azam Khan