Loksabha 2019 : ...पण मोदींना तोड नाही: वरुण गांधी

वृत्तसंस्था
सोमवार, 8 एप्रिल 2019

वरुण गांधी हे माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे चुलत बंधू आहेत. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांच्याकडे काँग्रेसची धुरा देण्यात आली. त्यामुळे या दोन कुटुंबात वादाची ठिणगी पडली.

नवी दिल्लीः माझ्या कुटुंबातही काहीजण पंतप्रधान होते, पण नरेंद्र मोदी यांनी देशाला जो सन्मान दिला, तो कित्येक वर्षांपासून कुणीही देऊ शकले नाही. मोदी केवळ देशासाठी जगत असून देशासाठीच ते आपला प्राण देतील. मोदींना केवळ देशाचीच चिंता आहे, असे सांगत भाजप नेते आणि खासदार वरुण गांधी यांनी मोदींचे कौतुक केले आहे.

उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर येथील खासदार आणि पीलभीत लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार वरुण गांधी यांनी मोदींवर रविवारी (ता. 7) प्रचारसभेत स्तुतीसुमने उधळली आहेत. गांधी घराण्यातील पंतप्रधानांशी तुलना करताना, मोदींनी देशाला त्यांच्यापेक्षा अधिक सन्मान मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. वरुण गांधी हे माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे चुलत बंधू आहेत. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांच्याकडे काँग्रेसची धुरा देण्यात आली. त्यामुळे या दोन कुटुंबात वादाची ठिणगी पडली.

सभेनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना वरुण गांधी म्हणाले, 'माझ्या कुटुंबातील काही लोक पंतप्रधानपदी राहिले आहेत. पण जो सन्मान मोदींनी देशाला मिळवून दिला आहे. तो दीर्घ काळापासून कोणीही देशाला देऊ शकला नव्हता. हा माणूस केवळ देशासाठी जगत असून देशासाठीच ते आपले प्राण देतील. त्यांना केवळ देशाची चिंता आहे. मी, अनेकदा पंतप्रधान मोदींना भेटलो, प्रत्येकवेळी मला त्यांच्यातील नेत्यासोबत एका माणसाचे दर्शन घडले. ते नेहमीच माझ्या पाठिशी वडिलांप्रमाणे उभे राहिले आहेत. मी 15 वर्षांपूर्वी भाजपत प्रवेश केला. मात्र, जर मी भाजपा सोडली तर राजकारणालाही रामराम करेन.'

वरुण गांधी पुढे म्हणाले, 'जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षात असता तेव्हा निर्णय तुमच्या नेतृत्वावर सोडावे लागतात. मला सुलतानपूर ऐवजी पिलिभीतमधून लढण्यास सांगण्यात आले. माझ्यासाठी सुलतानपूरही घर आहे आणि पिलिभीतही. माझ्यावर हेट स्पीचचे (भावना भडकवणारे भाषण) अनेक आरोप आहेत. मात्र, सर्व प्रकरणांमध्ये मी विजय मिळवला. तर तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारने औपचारिकरित्या माझी माफीही मागितली. मी हिंदू आहे आणि माझ्या दिवसाची सुरूवात हनुमान चालिसाने होते. पण माझ्या धर्माचे माझ्या राजकारणाशी काही देणे-घेणे नाही.'

काँग्रेस अध्यक्षांकडून 'चौकीदार चोर है' च्या घोषणा दिल्या जातात. मात्र, हे चुकीचे आहे. पंतप्रधान मोदी सध्या लोकप्रियतेत देशात पहिल्या क्रमांकावर आहेत. एखाद्या पंतप्रधानाला चोर म्हणणे चुकीचे आहे. आज मोदी पंतप्रधान आहेत. 20 वर्षांनंतर आणखी कोणी असेल, असेही वरुण गांधी म्हणाले.

Web Title: Loksabha 2019 bjp leader varun gandhi says pms in my family but Modi got the highest honor in the country