Loksabaha 2019 : भाजपसमोर जागा टिकवण्याचे आव्हान

Shripad-and-Ravi
Shripad-and-Ravi

गोव्यात भाजपचे सरकार असले, तरी पक्षांतर्गत संघटन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. कोणाचा कोणाला पायपोस नाही. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाने प्रशासनाचे कामकाजही रडतखडत सुरू आहे. भाजपसमोर पक्षांतर्गत आणि आघाडी सदस्यांच्या नाराजीचे आव्हान आहे. दुसरीकडे काँग्रेसचे संघटन मजबूत केले जात आहे.

गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा टिकवण्यासाठी भाजपला या वेळी बराच संघर्ष करावा लागणार आहे. राज्यात भाजप आघाडीचे सरकार असले, तरी जनतेत नाराजी आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गेल्या फेब्रुवारीपासून आजारी असल्याने, त्याचाही प्रशासनावर परिणाम झालाय. भाजपची दोन वर्षे घटक पक्षांच्या नाकदुऱ्या काढण्यात गेली आणि पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाले. 

भाजपसाठी खरे दुखणे आणखी वेगळेच आहे. मांद्रे, शिरोडा आणि म्हापसा या तीन विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणुका आहेत. त्यातील दोनमधून काँग्रेसचे आमदार निवडले होते; तर एका जागी भाजप आमदार होता. महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) आणि गोवा फॉरवर्ड हे प्रादेशिक पक्ष आहेत.

लोकसभेबरोबरच पोटनिवडणुका झाल्या, तर त्या लढण्याची त्यांची तयारी आहे. भाजपने मांद्रे आणि शिरोड्याच्या काँग्रेस आमदारांना राजीनामा देण्यास सांगून, भाजपमध्ये घेतले. म्हापसाचे भाजप आमदार फ्रान्सिस डिसोझांचे नुकतेच निधन झालंय. भाजपने फुटिरांना प्रोत्साहन दिल्यामुळे मगो पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांचे बंधू मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी भाजप उमेदवाराविरोधात शिरोडा मतदारसंघात दंड थोपटलेत. मांद्रे मतदारसंघात माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांनी उमेदवारी दिली नाही, तर अपक्ष लढण्याचा इशारा दिलाय. सोपटे भाजपमध्ये आल्याने त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. पार्सेकर तिथे लढण्यास इच्छुक आहेत. 

केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे, तर दक्षिण गोव्याचे ॲड. नरेंद्र सावईकर प्रतिनिधित्व करतात. गेल्या चार निवडणुकांत नाईक विजयी झालेत. सावईकर पहिल्यांदाच लोकसभेत गेले. मात्र, या वेळची स्थिती वेगळी आहे. खाणबंदीने दोन्हीही खासदारांची कोंडी केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्‍वासन दिले, पण प्रश्‍न कायम आहे. सरकारी नोकऱ्यांचा प्रश्‍नही उग्र बनलाय. भाजप सत्तेत असूनही कार्यकर्ते उपेक्षित राहिलेत, हा चिंतेचा भाग आहे. प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर राज्यसभेवर गेल्यापासून पक्षसंघटनेचे काम थंडावले. भाजपमध्ये अंतर्गत वाद आहेत. त्यावर तोडग्यासाठी नवी मुंबईतून सतीश धोंड गोव्यात संघटनमंत्री म्हणून आले, तरी त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. याउलट काँग्रेसने राहुल गांधी यांच्याबरोबर चार वर्षे काम केलेल्या गिरीश चोडणकरांना प्रदेशाध्यक्ष केल्याने पक्षात चैतन्य निर्माण झाले आहे.

२०१४ चे मताधिक्‍य
    उत्तर गोवा मतदारसंघ -
    श्रीपाद नाईक (भाजप) ः १,७६,१२४ (विजयी)
    रवी नाईक (काँग्रेस) ८७,१४५
    दत्ताराम देसाई (आप) ११,७९१

    दक्षिण गोवा मतदारसंघ -
    ॲड. नरेंद्र सावईकर (भाजप) १,९८,७७६ (विजयी)
    आलेक्‍स रेजिनाल्ड लॉरेन्स (काँग्रेस) १,६६,४४६
    स्वाती केरकर (आप) ११,२४६
    चर्चिल आलेमाव (तृणमूल काँग्रेस) ११,९४१ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com