Loksabha 2019 : ‘गुन्हेगार’ खासदारांत महाराष्ट्र अव्वल!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 मार्च 2019

मावळत्या लोकसभेच्या विद्यमान सदस्यांपैकी ३३ टक्के खासदारांवर ‘गुन्हेगार’ असल्याचा शिक्का आहे, असे त्यांनी २०१४ मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांवरून आढळून येते.

नवी दिल्ली - मावळत्या लोकसभेच्या विद्यमान सदस्यांपैकी ३३ टक्के खासदारांवर ‘गुन्हेगार’ असल्याचा शिक्का आहे, असे त्यांनी २०१४ मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांवरून आढळून येते. विशेष म्हणजे, या खासदारांमध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असल्याचे आढळून येते. राज्यातील ४८ पैकी ३१ खासदारांविरुद्ध गुन्ह्यांची नोंदणी असून, त्यापैकी १९ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या; म्हणजेच खून, अपहरण, महिलांविरोधी गुन्हे व जातीय तणाव निर्माण करण्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

‘नॅशनल इलेक्‍शन वॉच’ आणि ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक राइट्‌स’ या संघटनांतर्फे विद्यमान ५२१ खासदारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांचे अध्ययन करण्यात आले आहे. त्यातून ही माहिती बाहेर आली आहे. गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेले वीस टक्के (१०६) खासदार आहेत. खुनाचा आरोप असलेले दहा खासदार आहेत. यामध्ये भाजप (४) प्रथम क्रमांकावर आहे. 
काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, लोक जनशक्ती पक्ष, राष्ट्रीय जनता दल, शिवसेना व स्वाभिमानी पक्ष यांच्या प्रत्येकी एका खासदारावर खुनाचा आरोप आहे. खुनाच्या प्रयत्नाचा आरोप असलेल्या १४ खासदारांमध्ये भाजपचे सर्वाधिक म्हणजे आठ खासदार आहेत. 

जातीय सलोखा नष्ट करण्याच्या आरोपात १४ खासदार गुंतलेले असून, त्यामध्येही प्रथम क्रमांकावर भाजप (१०) आहे. मजलिसे इत्तेहादूल मुसलमीनच्या (एमआयएम) खासदाराचाही त्यात समावेश आहे.

कोट्यधीश खासदारांमध्ये तेलुगू देसमने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर अकाली दल, तर तिसऱ्या क्रमांकावर वायएसआर काँग्रेस आहे. पुढील क्रमानुसार राष्ट्रीय जनता दल, धर्मनिरपेक्ष जनता दल, संयुक्त जनता दल, शिवसेना, तेलंगण राष्ट्र समिती, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, भाजप, लोक जनशक्ती पक्ष, काँग्रेस, अण्णा द्रमुक, आप, बीजू जनता दल व शेवटच्या म्हणजेच २१ व्या क्रमांकावर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे. तृणमूल काँग्रेस दोन क्रमांक अलीकडे म्हणजे १९ व्या क्रमांकावर आहे.
पन्नास कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता असलेले तीन खासदार आहेत.

केसिनेनींवर ७१ कोटी कर्ज!
कर्जाचा मोठा बोजा डोक्‍यावर असलेले खासदारही आहेत. तेलुगू देसमचे श्रीनिवास केसिनेनी (आंध्र प्रदेश) यांच्यावर ७१ कोटी रुपयांचा बोजा आहे. भाजपच्या खासदार व भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा खासदार पूनम महाजन राव यांच्यावर ४१ कोटी रुपयांचा बोजा आहे तर अकाली दलाच्या नेत्या, केंद्रीय मंत्री व प्रकाशसिंग बादल यांच्या सूनबाई हरसिम्रतकौर बादल यांच्यावरही ४१ कोटी रुपयांचा बोजा असल्याची नोंद आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Criminal MP Maharashtra Topper