मोदींची अनोखी कामगिरी; आता नेहरू-इंदिरा गांधींच्या पंक्तीत दाखल! 

Narendra Modi
Narendra Modi

लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान झाल्यापासून, किंबहुना त्याहीपूर्वीपासून नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नेहरू-गांधी घराण्याचे भारतातील राजकीय वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजप आणि मोदी सातत्याने प्रयत्नशील आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये आज मिळविलेल्या दणदणीत विजयानंतर मोदी यांनी नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याच पंक्तीत स्थान पटकाविले आहे. 

सलग दुसऱ्या वेळी स्पष्ट बहुमतासह सत्तेत दाखल होण्याचा मान यापूर्वी नेहरू आणि इंदिरा गांधी यांना मिळाला होता. आता मोदी यांनीही या कामगिरीची पुनरावृत्ती करून दाखविली आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू असून अंतिम आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. पण भाजपला तीनशेच्या जवळपास जागा मिळाल्या आहेत. लोकसभेमध्ये बहुमतासाठी 272 जागांची गरज असते. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. आता भाजपने त्याहीपेक्षा उत्तम कामगिरी केली आहे. 

राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसने गेल्या निवडणुकीपेक्षा किंचित बरी कामगिरी केली आहे. 2014 मध्ये काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. आता काँग्रेसने पन्नासहून अधिक जागा मिळविल्या आहेत. 

नेहरू यांनी 1951 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत तीन चतुर्थांश जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 1957 आणि 1962 या दोन्ही निवडणुकांमध्ये पूर्ण बहुमत मिळविले होते. 1967 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी यांनी 283 जागा जिंकल्या होत्या. 'गरीबी हटाओ'च्या घोषणेसह इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये 352 जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळविले होते. 

आता मोदी यांनी 2014 मध्ये 282 जागा आणि 2019 मध्ये 300 हून अधिक जागा जिंकत नेहरू-गांधी यांच्याच कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com