Loksabha 2019 : तेजबहादूर यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मे 2019

तेज बहादूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र निवडणूक आयोगाने अर्ज रद्दबातल केल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

नवी दिल्ली : वाराणसीतून सपकडून निवडणूक लढण्याची तयारी करणारे निलंबित जवान तेजबहादूर यादव यांना आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाकडूनही झटका बसला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याबरोबरच याचिकाही फेटाळून लावली आहे.

निवडणूक आयोगाने तेजबहादूर यांचा उमेदवारी अर्ज रद्द केल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिका फेटाळून लावताना निवडणूक आयोगाच्या कामात हस्तक्षेप करणार नसल्याचे न्यायालयाने सांगितले.

तेज बहादूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र निवडणूक आयोगाने अर्ज रद्दबातल केल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. काल न्यायालयाने तेजबहादूर यांच्या तक्रारीवर फेरविचार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज पुन्हा सुनावणी झाली. निवडणूक आयोगाकडून राकेश द्विवेदी यांनी बाजू मांडली. या वेळी त्यांनी आरपी कायद्यासह जुन्या निर्णयाचा संदर्भ दिला. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयामुळे मोदींच्या विरोधात लढण्याची तयारी करणाऱ्या सप-बसपला झटका बसला.

दरम्यान, तेजबहादूर यादव यांनी लष्करात दिल्या जाणाऱ्या अन्नाबाबत तक्रार करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यामुळे त्यांना 2017 मध्ये लष्करातून निलंबित करण्यात आले. यादव यांनी समाजवादी पक्षाकडून अर्ज भरला होता. मात्र, लष्कराकडून "ना हरकत पत्र' आणण्याच्या मुद्द्यावरून तो रद्द करण्यात आला होता. आपल्याविरोधात भाजपने कटकारस्थान केले असल्याचा यादव यांचा आरोप आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SC dismisses ex BSF jawan Tej Bahadur Yadavs plea