Loksabha2019: रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 मार्च 2019

- उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून लढणार
- उर्मिला यांची लढत भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बरोबर
-  बुधवारी (ता. 27) उर्मिला यांनी केला होता काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली - रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उर्मिला यांची लढत भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बरोबर होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. 27) उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, मालाड पश्चिमचे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख आणि मुंबई काँग्रेस सरचिटणीस भूषण पाटील हे उर्मिला मातोंडकर यांच्या समवेत बुधवारी दिल्लीला गेले होते, यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला होता.

उत्तर मुंबई या मतदारसंघात गोपाळ शेट्टींना आव्हान देण्यासाठी काँग्रेसकडून ग्लॅमरस चेहऱ्याचा शोध सुरू होता. आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांच्यां नावांचीही उत्तर मुंबईतून उमेदवारीसाठी चाचपणी झाली होती पण, शेवटी रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 

दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचा 4 लाख 46 हजार मतांनी पराभव केला होता. तर, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत अभिनेता गोविंदला काँग्रेसने उत्तर मुंबईतून तिकीट दिले होते, त्यांनी उत्तर प्रदेशचे विद्यमान राज्यपाल आणि माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांचा पराभव केला होता. 2014 साली झालेल्या निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Urmila Matondkar to contest from Mumbai North parliamentary constituency