अशोक वालम कोकण शक्ती महासंघातर्फे निवडणूक रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मार्च 2019

कोकण शक्ती महासंघ यापुढे विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत राहणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जो राजकीय पक्ष महासंघाच्या उमेदवाराला पाठिंबा देईल, त्या पक्षाच्या लोकसभेतील उमेदवाराला महासंघ पाठिंबा देईल.
-  अशोक वालम, अध्यक्ष कोकण शक्ती महासंघ

राजापूर - नाणार रिफायनरीच्या विरोधात संघर्ष समिती स्थापून ताकद निर्माण झाल्याने अशोक वालम यांनी आता थेट राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. समिती विधानसभा निवडणूक कोकण शक्ती महासंघ या नावाने लढवणार आहे.

महासंघाच्या उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या पक्षाला लोकसभेसाठी पाठिंबा देण्यात येईल, अशी घोषणा करून वालम यांनी आपल्या संघटनेची बार्गेनिंग पॉवर जोखण्याचा प्रयत्न केला आहे. श्री. वालम यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत स्वाभिमान पक्षाच्या विजयी मेळाव्यात आज आपले हे राजकीय मनसुबे जाहीर केले. समितीचे आता कोकण शक्ती महासंघ असे नामांतर करण्यात आले.

नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात अशोक वालम यांच्या अध्यक्षतेखालील कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी एकजूट केली होती. विविध प्रकारची आंदोलनेही स्थानिक पातळीवर आणि मुंबई येथील आझाद मैदानावर छेडली होती. त्याला राजकीय पक्षांनी पाठबळ दिले. रिफायनरीची भूसंपादन अधिसूचना रद्द केल्याच्या घोषणेचे प्रकल्पग्रस्तांकडून स्वागत करण्यात आले.

लोकांनी दिलेल्या लढ्याला यश अशा शब्दामध्ये लोकांकडून भावना व्यक्त केल्या गेल्या. हा प्रकल्प रद्द केल्याचा विजयोत्सव गेल्या दोन दिवसांपूर्वी कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी साजरा केला. यावेळी वालम यांनी संघटनेच्या नामांतराची घोषणा आणि पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली. 

कोकण शक्ती महासंघ यापुढे विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत राहणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जो राजकीय पक्ष महासंघाच्या उमेदवाराला पाठिंबा देईल, त्या पक्षाच्या लोकसभेतील उमेदवाराला महासंघ पाठिंबा देईल.
-  अशोक वालम,
अध्यक्ष कोकण शक्ती महासंघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Walam contestant of Ratnagiri Sindhudurg Lok sabha