Loksabha 2019 : सिंधुदुर्ग-रत्नागिरीत कार्यकर्त्यांच्या ताकदीवर ठरणार विजयाचे गणित 

Loksabha 2019 : सिंधुदुर्ग-रत्नागिरीत कार्यकर्त्यांच्या ताकदीवर ठरणार विजयाचे गणित 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ राजकारणाला "मोस्ट अनप्रिडेक्‍टेबल क्षेत्र' समजलं जातं. इथं काही शाश्‍वत नसतं. कधी काय होईल, कोण-कोणाच्या बाजूने तर, कोणाच्या विरोधात हे चित्र कोणत्याही क्षणी बदलू शकते. तशीच काहीशी परिस्थिती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सध्या अनुभवता येत आहे. सहा पैकी पाच आमदार शिवसेनेचे असल्याने हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे; पण कार्यकर्त्यांची तगडी फौज असल्याने स्वाभिमान पक्षानेही आत्तापासूनच या मतदारसंघात आव्हान निर्माण केलंय. त्याअनुषंगाने होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यांनी गावागावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मतदारसंघात राजकीय धुळवड आणखी रंगणार असून कार्यकर्त्यांची ताकद आणि विजयासाठी घेतलेली मेहनत यावरच उमेदवाराच्या विजयाचे गणित ठरणार आहे. 

नव मतदार निर्णायक 
16व्या लोकसभेची निवडणूक 2014ला झाली. यात राणे विरुद्ध शिवसेनेचे विनायक राऊत, असा जंगी सामना रंगला, मात्र राणेंना तब्बल दीड लाखांनी चितपट करीत शिवसेनेने येथे पुन्हा भगवा फडकावला. यात मोदी लाट, नवमतदार आणि मतदानाची वाढलेली टक्‍केवारी यांची भूमिकाही महत्वाची ठरली. यंदाही नवमतदारांचा कौल निर्णायक ठरण्याची शक्‍यता आहे. 2009 मध्ये 57 टक्‍के तर 2014 मध्ये 65 टक्‍के एवढे मतदान झाले होते. तसेच 2009 च्या तुलनेत 2014 मध्ये 1 लाख 15 हजार एवढे मतदार वाढले होते. यंदा 2019च्या निवडणुकीत 97 हजार एवढे नवमतदार आहेत. तर एकूण 14 लाख 41 हजार मतदार असून यात महिला मतदारांची संख्या 7 लाख 35 हजार 609 आहे. 

पाच लाखांचा पल्ला गाठण्याचे लक्ष 
2014 मध्ये शिवसेनेचे विनायक राऊत यांना 4 लाख 93 हजार मते मिळाली होती. तर नीलेश राणे यांना 3 लाख 53 हजार मते मिळाली. यंदाच्या लोकसभेतही नऊ ते साडे नऊ लाख मतदान होईल, या अपेक्षेने किमान 5 लाख मतांचा टप्पा गाठण्याचे लक्ष शिवसेना आणि स्वाभिमान पक्षाकडून ठेवण्यात आले आहे. त्याअनुषंगाने गावनिहाय पक्षप्रवेश सोहळे करून राजकीय वातावरण तापवले जात आहे. याखेरीज खासगी एजन्सीच्या माध्यमातूनही मतदारसंघनिहाय मतदारांचा कौल जाणून घेतला जात आहे. याखेरीज मतदारांना अपील होणारे वेगवेगळे मुद्दे देखील आणले जात आहेत. 

आमदारांची प्रतिष्ठा पणाला 
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात पाच आमदार शिवसेनेचे तर एक आमदार कॉंग्रेसचे आहेत. त्यामुळे शिवसेनेचे पारडे जड आहे; मात्र शिवसेनेला सहकार्य करण्याबाबत भाजपची संदिग्ध भूमिका राहिलीय. तर राष्ट्रवादीचा राणेंना पाठिंबा असणार आहे. 2014 मध्ये सावंतवाडी मतदारसंघातून सर्वाधिक 41 हजार 630 एवढे मताधिक्‍य विनायक राऊत यांना मिळाले होते. तर कणकवली मतदारसंघात अवघे 1607 मताधिक्‍य होते. याखेरीज चिपळूणमधून 31 हजार 140, रत्नागिरीतून 31 हजार 585, राजापूर 22 हजार 245 आणि कुडाळ मतदारसंघातून 21 हजार 839 एवढे मताधिक्‍य होते. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाचही आमदारांना 2014 मध्ये मिळालेले मताधिक्‍य टिकवून ठेवण्याचे आव्हान पार पाडावे लागणार आहे. तर आमदार नीतेश राणे यांना कणकवली विधानसभा निवडणुकीत मिळालेले 25 हजाराचे मताधिक्‍य आणखी वाढविण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. 

राष्ट्रवादी, भाजप, मनसे निर्णायक 
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजप पक्षांची प्रत्येकी एक ते सव्वा लाख मते आहेत. तुल्यबळ लढत पाहता ही मते निर्णायक ठरण्याची शक्‍यता आहे. यात राष्ट्रवादीची मते राणेंच्या पारड्यात जातील तसेच भाजपची 50 टक्‍के मतेही राणेंकडे जातील, अशी शक्‍यता आहे. त्याचा परिणाम शिवसेनेच्या उमेदवारावर होणार आहे. याखेरीज मनसे, भारिप आदी छोट्या पक्षांचीही मते निर्णायक ठरण्याची शक्‍यता आहे. 

सोशल मीडियावर स्वाभिमान आक्रमक 
2014च्या निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रचंड प्रभाव होता. मोदी सरकार निवडून येण्यातही सोशल मीडियाने महत्वाची भूमिका बजावली होती. त्याअनुषंगाने स्वाभिमान पक्षाने गेल्या दोन महिन्यांपासूनच त्याच माध्यमातून प्रचारात आघाडी घेतली आहे. अत्यंत शिस्तबद्धपणे स्वाभिमानची प्रचार यंत्रणा मतदारापर्यंत पोचवली जात आहे. 

बांदिवडेकरांची उमेदवारी कुणाच्या पथ्यावर? 
2014च्या निवडणुकीत कॉंग्रेसची एक ते दीड लाख मते नीलेश राणेंच्या पारड्यात होती, असा दावा कॉंग्रेसकडून केला जातोय. ही मते आता कॉंग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्याकडे असतील. तसेच भंडारी समाजाचीही एक ते दीड लाख मते बांदिवडेकर यांना मिळाली तर त्याचा तोटा शिवसेनेचे श्री.राऊत यांना होईल, की स्वाभिमानचे नीलेश राणे यांना याबाबतचे तर्कवितर्क मतदारसंघात लढवले जात आहेत. 

अनेक वर्षे समाजाच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी सामाजिक कार्यात आहेत. यापुढे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा उद्देश आहे. भंडारी समाज संघटनेचा अध्यक्ष असलो तरी जात-पात मानत नाही. लोकसभेचा उमेदवार असल्याने सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यास प्रयत्न राहील. 
- नवीनचंद्र बांदिवडेकर,
कॉंग्रेस उमेदवार 

खासदार विनायक राऊत यांना पाच वर्षांत एकही उद्योग, रोजगार आणता आला नाही. कोकणच्या विकासाची दृष्टी ठेवून त्यांच्याकडून कोणतीही ठोस योजना मांडलेली नाही. केवळ भाजप मंत्र्यांच्या कामाचे फुकाचे श्रेय ते घेतात. कोकणला पाच वर्षे मागे नेण्याचे काम त्यांनी केले आहे. कोकणच्या विकासाचा "बॅकलॉग' भरून काढू. 
- नीलेश राणे,
स्वाभिमान उमेदवार 

केंद्र सरकारमुळे सोनवडे घाट मार्गी लागला. रखडलेल्या चिपी विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू होईल. तर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल. कोकण रेल्वे दुपदरीकरणास प्रारंभ होईल. वनसंज्ञा, कबुलायत गावकर प्रश्‍न अंतिम टप्प्यात आहेत. पुढील पाच वर्षांत प्रदूषण विरहित रोजगार निर्मितीला प्राधान्य असेल. 
- विनायक राऊत,
शिवसेना उमेदवार 

लोकसभा 2009 चे चित्र 
उमेदवार.........पक्ष...........मिळालेली मते 
नीलेश राणे.....कॉंग्रेस........3,53,915 
सुरेश प्रभू........शिवसेना.....3,07,165 
सुरेंद्र बोरकर.....अपक्ष...........18,585 
जयेंद्र परुळेकर....बसप..........15,469 

लोकसभा 2014चे चित्र 
उमेदवार...............पक्ष...............मिळालेली मते 
विनायक राऊत.......शिवसेना..........4,93,088 
नीलेश राणे.............कॉंग्रेस............3,43,037 
राजेंद्र आयरे............बसप..................13,088 
अभिजित हेगशेटये....आप..................12,700 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार 

  • पुरूष - 7,06,327 
  • स्त्रीया - 7,35,609 
  • एकूण - 14,41, 936 

मतदारसंघातील विद्यमान आमदार 

  • चिपळूण - सदानंद चव्हाण - शिवसेना 
  • रत्नागिरी - उदय सामंत - शिवसेना 
  • राजापूर - राजन साळवी - शिवसेना 
  • कणकवली - नीतेश राणे - कॉंग्रेस 
  • कुडाळ - वैभव नाईक - शिवसेना 
  • सावंतवाडी - दीपक केसरकर - शिवसेना 


मतदारसंघातील महत्वाचे प्रश्‍न 

  • बेरोजगारी, रखडलेली नोकरभरती 
  • पर्यटनवाढीसाठी पायाभूत सुविधांचा अभाव 
  • मत्स्यदुष्काळ आणि पर्ससीनचे आक्रमण 
  • फळ आणि मच्छीवर प्रक्रिया उद्योगांचा अभाव 
  • जलवाहतुकीविना ओस पडलेली बंदरे 
  • रखडलेले धरण प्रकल्प, वनसंज्ञा, कबुलायत गावकर, आंजिवडे, सोनवडे घाटमार्ग. 

मतदारांवर प्रभाव टाकणारे घटक 

  • वाढती महागाई, इंधनाचे वाढते दर 
  • किसान सन्मान, उज्वला गॅस योजना 
  • मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण 
  • सैन्यदलाचा "एअर स्ट्राईक'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com