Loksabha 2019 : सेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे काटे

Loksabha 2019 : सेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे काटे

रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते (शिवसेना) विरुद्ध सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) असा सामना होणार आहे. शेतकरी कामगार पक्ष या वेळी काँग्रेस आघाडीसोबत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेकापला कायम विरोध करणारी काँग्रेसची मते अनंत गीतेंच्या पारड्यात पडण्याची शक्‍यता आहे. भाजपची मते निर्णायक आहेत.

सतत ६ वेळा अनंत गीते खासदार झाल्याने त्यांच्या विरोधातील एक मतप्रवाह देखील मजबूत होत आहे. शेकापला सोबत घेऊन तटकरेंनी विजयाचा मार्गावर एक पाऊल टाकले. त्यामुळे सातव्यांदा विजयश्री खेचून आणण्यासाठी अंतर्गत विरोध, भाजपला सन्मान, समाजातील पकड मजबूत करणे, अशा अनेक आघाड्यांवर यशस्वी होण्याची कसरत अनंत गीतेंना करावी लागेल.

भाजपला सन्मानाने घ्यावे लागेल बरोबर
चिपळूण तालुक्‍यातील ७२ गावे रायगड लोकसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत. खाडीपट्ट्यातील ग्रामीण भागात ४० टक्के राष्ट्रवादी, ४० टक्के शिवसेना व २० टक्के भाजप असे चित्र आहे. या परिसरात गीतेंविरोधात एक मतप्रवाह आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गीतेंविरोधातील मतप्रवाहाला बळ देण्यासाठी तालुक्‍यातील तटकरे समर्थक गुप्त बैठकाही घेत आहेत. शिवसेनेची संपूर्ण ताकद गीतेंपाठी उभे करण्याचे आव्हान शिवसैनिकांना पेलावे लागणार आहे. येथील भाजपचे मतदार मोदी पंतप्रधान होण्यासाठी गीतेंना मतदान करतील. मात्र, त्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांना भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढून, मागील टीका टिप्पणी विसरायला लावून गीतेंच्या प्रचारात सन्मानाने सोबत घ्यावे लागेल. 

तटकरेंच्या अडचणी वाढणार
आमदार भास्कर जाधव यांना दुखावलेल्या पायामुळे पूर्वीसारखा प्रवास करता येणार नाही. अशावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते सुनील तटकरेंचा प्रचार झोकून देऊन करणार का, याबाबत साशंकता आहे. समांतर व्यवस्था उभी करणे शक्‍य असले तरी ती देखील तटकरेंसाठी अडचणीची ठरू शकते. येथील बहुसंख्य कुणबी समाजाने मजबूत संघटन उभे केले आहे. तरीही समाज संघटना एका उमेदवाराला मतदान करण्यासाठी पुढाकार घेईल, असे चित्र अद्याप नाही. समाज म्हणून अनंत गीतेंनाच निवडून आणण्याचा निर्णय झाला तर तटकरेंसमोरील अडचणी वाढणार आहेत. तालुक्‍यातील भाजपची मतेही निर्णायक आहेत. परंतु त्यांना जोडून घेण्यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा,असा शिवसेनेसमोर प्रश्न आहे. 

सूर्यकांत दळवींना गीतेंच्या भेटीची आच 
एकेकाळी शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या तालुक्‍यातील ३ जिल्हा परिषद गट व पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. काँग्रेसही सोबत असल्याने तटकरेंसाठी अनुकूल वातावरण आहे. याउलट सूर्यकांत दळवी नाराज असून गीतेंच्या भेटीसाठी वाट पहात आहेत. गत लोकसभा निवडणुकीतील हिशोब शिवसेनेने पूर्ण न केल्याने भाजप नाराज आहे. त्यामुळे १८ हजारांचे मताधिक्‍य सांभाळून ठेवण्याचे आव्हान गीतेंसमोर आहे. या मतदारसंघातून योगेश कदम विधानसभेत जावेत,अशी रामदास कदमांची इच्छा आहे. त्यासाठी येथील अनंत गीतेंच्या प्रचाराची सर्व जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. या सर्वांमध्ये समन्वयाची मोट गीतेंसाठी कदम बांधणार, हीच शिवसैनिकांसाठी आनंदाची गोष्ट आहे.

समाजाचा मुद्दा पडेल मागे 
तालुक्‍यात शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष तुल्यबळ आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये दोन्ही पक्षांचे समान प्रतिनिधीत्व आहे. यापूर्वी अनंत गीतेंच्या निवडणुकीत समाज हा मुद्दा महत्त्वाचा होता. मात्र,या निवडणुकीत समाजाचा मुद्दा मागे पडेल. काँग्रेसची एकगठ्ठा मते सुनील तटकरेंच्या तर भाजपची मते अनंत गीतेंच्या पारड्यात पडतील, असे सध्याचे चित्र आहे. 

खेड तालुक्‍यात दोघांनाही डोकेदुखी
दापोली मंडणगड व गुहागर विधानसभा मतदारसंघात विभागलेला खेड तालुका कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. रामदास कदमांचे वर्चस्व असलेल्या खेड शहरात नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी मनसेची ताकद वाढवली आहे. आमदार संजय कदम यांनीही गेल्या १० वर्षात तालुक्‍यात राष्ट्रवादी रुजविण्यासाठी मेहेनत घेतली आहे. लोटेमधील घटनेनंतर भाजपमध्ये शिवसेना व अनंत गीतेंबद्दल असलेल्या नाराजीत वाढ झाली आहे. त्यामुळे गीतेंना आपली मते वाढविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्‍टा करावी लागेल तर तटकरे यांना विविध असंतुष्ट गटांना चुचकारून मताचे दान आपल्या पदरात पाडून घ्यावे लागेल.

तटकरेंपुढे आव्हान गृहकलहाचे
एकेकाळचा काँग्रेसचा गड  शिवसेनेने ताब्यात घेतला. १९९५, १९९९ व २००४  मध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आले. २००९ च्या निवडणुकीत सुनील तटकरेंनी शिवसेनेकडून हा मतदारसंघ हिरावून घेतला. परंतु २०१४ निवडणुकीत राष्ट्रवादीचे अवधूत तटकरे केवळ ७७ मतांनी विजयी झाले. आजही शिवसेनेची या मतदारसंघात ताकद आहे. हे लक्षात घेऊन सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे व पुतण्या अवधूत तटकरे शिवसेनेत जाण्याची चर्चा सुरु आहे. ही बाब सुनील तटकरेंसाठी अडचणीची आहे. प्रबळ पक्ष आणि बहुसंख्येने असलेला कुणबी समाज हे दोन मुद्दे अनंत गीतेंना बळ देणारे आहेत. 

काँग्रेसची मते मिळविण्यासाठी हवी  मेहनत
२००४ चा अपवाद वगळता १९९० पासून ५ वेळा या मतदारसंघाने शिवसेनेला प्रतिनिधीत्व दिले. येथील बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व आमदार भरत गोगावले करतात. त्यांचा गावागावांतील जनसंपर्क अनंत गीतेंच्या पाठी खंबीर उभा राहील, असे वातावरण आहे. राष्ट्रवादीपेक्षा पारंपरिक काँग्रेसचा अधिक मतदार आहे. या निवडणुकीत शेकाप राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीत सोबत आहे. त्याला काँग्रेसचा अंतर्गत विरोध आहे. त्यामुळे येथील काँग्रेसची मते मिळविण्यासाठी सुनील तटकरेंना मेहनत करावी लागणार आहे. 

रवी पाटील भाजपवासी हा गीतेंसाठी दिलासा
हे दोन्ही मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजले जातात. येथील दोन्ही आमदार शेकापचे आहेत. ग्रामीण भागात शेकाप, राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस यांचे वर्चस्व आहे. शहरी भागात भाजपने चंचुप्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी व काँग्रेसने केलेली आघाडी शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार आहे. पेणमधील काँग्रेसचे माजी राज्यमंत्री रवि पाटील भाजपवासी झाले आहेत. ही गीतेंसाठी दिलासा देणारी गोष्ट आहे. तर रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी व शेकाप युती सत्तेत आहे.लोकसभेसाठी राष्ट्रवादीला व विधानसभेसाठी शेकापला मदत करण्याचा अलिखित करार आहे. त्याचा फायदा सुनील तटकरेंना मिळणार आहे.  

२०१४ च्या निवडणुकीतील चित्र

  •  अनंत गीते (शिवसेना) ......३९६१७८
  •  सुनील तटकरे (राष्ट्रवादी).....३९४०६८

  (२११० मतांनी गीते विजयी)

मतदारसंघातील विद्यमान आमदार

  •  गुहागर : भास्कर जाधव (राष्ट्रवादी)
  •  दापोली मंडणगड : संजय कदम (राष्ट्रवादी)
  •  श्रीवर्धन : अवधूत तटकरे (राष्ट्रवादी)
  •  महाड : भरत गोगावले (शिवसेना)
  •  अलिबाग : सुभाष तथा पंडित पाटील (शेकाप)
  •  पेण : धैर्यशील पाटील (शेकाप)

मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न

  •  औद्योगिकीरणामुळे  जलस्रोत प्रदूषित
  •  पर्यटनवाढीसाठी पायाभूत सुविधांचा अभाव
  •  मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण
  •  मच्छीमारीचे घटते प्रमाण 
  •  फळ व मच्छीवर प्रक्रिया उद्योगांचा अभाव
  •  सागरी जलवाहतुकीची कुंठित अवस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com