Loksabha 2019 : स्वाभिमानचा जोर, शिवसेना शांतच 

एकनाथ पवार
मंगळवार, 19 मार्च 2019

वैभववाडी - स्वाभिमानच्या तुलनेत कमकुवत संघटन आणि भाजपचे तळ्यात-मळ्यात यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला तालुक्‍यात प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी सभा घेऊन प्रचाराची राळ उठविली असताना शिवसेनेच्या गोठात मात्र अजुनही शांतताच आहे. 

वैभववाडी - स्वाभिमानच्या तुलनेत कमकुवत संघटन आणि भाजपचे तळ्यात-मळ्यात यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला तालुक्‍यात प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी सभा घेऊन प्रचाराची राळ उठविली असताना शिवसेनेच्या गोठात मात्र अजुनही शांतताच आहे. 

वैभववाडी तालुका हा स्वाभिमानचा बालेकिल्ला मानला जातो. स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा अपवाद वगळता नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणुकीत स्वाभिमानच वरचढ ठरलेली आहे. 2014 नंतर या तालुक्‍यातील पक्षाची सूत्रे आमदार नितेश राणेंनी स्वतःकडे घेतली. त्यानंतर त्यांनी सतत तालुक्‍यात संपर्क ठेवला. वर्षानुवर्षे राजकारणात असलेल्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी गावागावांतील युवा कार्यकर्त्यांची मोट चांगल्या पध्दतीने बांधली. या कार्यकर्त्यांशी ते थेट संवाद साधत असल्यामुळे कार्यकर्ते आत्मविश्‍वासाने काम करीत आहेत. 

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आमदार राणेंनी वैभववाडी तालुका संपूर्ण "स्वाभिमान'मय करण्याचा प्रयत्न केला आहे. काही महिन्यांपूर्वी पडद्यामागे राहुन त्यांनी पक्षाचा भव्य मेळावा घेतला. त्यानंतर महाराणा प्रतापसिंह कलादालन सुरू करून पर्यटनाचे एक नवे दालन खुले केले. त्यातुन त्यांनी अनेक गोष्टी घडवून आणल्या आहेत. त्यामुळे तालुक्‍यात त्यांनी पक्षाची घडी अतिशय नियोबद्ध बसविली आहे. त्यातच तालुक्‍यात "स्वाभिमान'च्या कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे.

बहुतांश ग्रामपंचायती या पक्षाच्या ताब्यात आहेत. एक जिल्हा परिषद सदस्य, तीन पंचायत समिती सदस्य आहेत. गावागावांत सक्षम पदाधिकारी आहेत. त्यामुळे तालुक्‍यात इतर पक्षाच्या तुलनेत हा पक्ष मजबूत आहे. तालुक्‍यावरील पकड अधिक घट्ट करण्यासाठी कार्यकर्ते सरसावले आहेत. 

भाजपचा सामान्य कार्यकर्ता शिवसेनेसोबत 
भाजपचे पदाधिकारी शिवसेनेचे काम करणार नाहीत, अशी वल्गना करीत असले तरी भाजपचा सामान्य कार्यकर्ता शिवसेनेसोबत असल्याचे चित्र आहे. कारण यापूर्वी झालेल्या अनेक निवडणुका तालुक्‍यात शिवसेना आणि भाजपाने एकत्रित लढल्या आहेत. त्याचाच हा परिणाम असल्याची चर्चा आहे. 
 
शिवसेनेची वाट बिकट? 
शिवसेनेची पाळेमुळे खोलवर रुजलेला तालुका म्हणून वैभववाडीची ओळख आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची संख्या "स्वाभिमान'च्या तुलनेत खुपच कमी असली तरी शिवसेनेला मानणारा एक मतदार अजुनही या तालुक्‍यात आहे; मात्र भाजपचे सुरू असलेले तळ्यात-मळ्यात शिवसेनेची वाट बिकट करणारे आहे. तगड्या "स्वाभिमान'शी दोन हात करण्यासाठी शिवसेनेच्या मोजक्‍या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीत प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Sindhudurg Constituency Special