Loksabha 2019 : मराठमोळा पक्ष कूस बदलतोय

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते प्रचारसभा घेत असतानाच तरुणांना आकर्षित करण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभरात कॉर्पोरेट प्रचार करत आहेत.

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते प्रचारसभा घेत असतानाच तरुणांना आकर्षित करण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभरात कॉर्पोरेट प्रचार करत आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू झालेली प्रचाराची परंपरा उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवली. मात्र, आता हा मराठमोळा पक्ष कूस बदलतोय. औरंगाबादच्या सरस्वती भुवनमध्ये मंगळवारी पार पडलेल्या ‘हॅशटॅग-युवांचा आदित्य’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने कॉर्पोरेट प्रचाराचा प्रत्यय आला. या कार्यक्रमाचे चित्र शिवसेनेच्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांना तरुणांशी मोकळेपणाने संवाद साधता यावा, यासाठी रॅम्प उभारण्यात आला होता. चकाचक स्टेज, रॅम्प वॉक पोडियम, तरुणांना बसण्यासाठी खास गॅलरी, रॉक बॅंड, तरुणांची गर्दी, लाइट्‌स, अर्ज भरून घेताना शिस्तबद्ध तरुणाई हे सगळे वातावरण शिवसेनेच्या पारंपरिक प्रतिमेला पुरते छेद देणारे होते. 

या कार्यक्रमाला तरुणांनी मोठी गर्दी केली होती. आदित्य ठाकरे यांनीही तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. अगदी औरंगाबाद शहराच्या समस्यांवरही आदित्य ठाकरे यांनी अडखळत का होईना, उत्तर देऊन समाधान करण्याचा  प्रयत्न केला. 

तरुणाईची मनमोकळी दाद
प्रचाराच्या बदललेल्या या रूपाला तरुणाईनेही मनमोकळी दाद दिली. अनेकांना प्रचाराचा हा फंडा आवडला. मात्र या ठिकाणी साधला गेलेला संवाद प्रत्यक्षात उतरावा, अशी अपेक्षाही तरुण मतदारांनी बोलून दाखवली. असेच कार्यक्रम राज्याच्या अन्य ठिकाणीही आयोजित केल्याची माहिती शिवसेना भवनातून देण्यात आली.

Web Title: Aaditya Thackeray is doing corporate campaigns across the state