Loksabha 2019 : 'कोणतरी साहेबांना थोडी अक्कल द्या रे'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत भाजपने व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला असून, एकमेकांविरोधात ओराप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. आरोप-प्रत्यारोपांसाठी सोशल मीडियाचाही मोठा वापर केला जात असून, भारतीय जनता पक्षाने व्यंगचित्राच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत भाजपने व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांनी 2014 मध्ये भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रस- राष्ट्रवादीला पाडण्यासाठी साथ द्या अशा घोषणा दिल्या होत्या. मात्र, यंदाच्या म्हणजेच 2019च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ द्या, अशी साद घालत असल्याचे चित्र यामधून दाखवण्यात आले आहे.

व्यंगचित्रात काय म्हटले आहे पहा...
2014 निवडणूकः
चला चला! काँग्रेस-राष्ट्रवादीला पाडण्यासाठी साथ द्या. 2014 काँग्रेस-राष्ट्रवादी

2019 निवडणूकः
काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ द्या
आपल्याला हे काय मूर्ख समजतात का?
कोणीतरी साहेबांना थोडी अक्कल द्या रे.

भाजपने व्यंगचित्र करताना #PhirEkBaarModiSarkar असा हॅशटॅग दिला असून, ते @mnsadhikrut व @RajThackeray यांना ट्विट केले आहे.

दरम्यान, मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. मनसेच्या निर्णयाने अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला असेल. मात्र, मनसेच्या भूमिकेमुळे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे झोप उडणार आहे. कारण, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शविला होता. परंतु, यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी दंड थोपटले आहेत. तसेच भाजपला पाडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पक्षांना मदत करण्याचा निश्चय केला आहे. त्यांमुळे याचा फायदा सहाजिकच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होणार असल्याचे दिसून येत आहे.

राज ठाकरे यांच्या राज्यात साधारण सहा ते नऊ जागांवर सभा होतील. यामध्ये बारामती, मावळ, नाशिक, नांदेड, सातारा, सोलापूर, उत्तर मुंबई, उत्तर पूर्व आणि उत्तर मध्य मुंबई आदी लोकसभा मतदारसंघाची चर्चा आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

Web Title: Bjp Targets Mns Chief Raj Thackeray on Cartoon