Loksabha 2019 : तुम्हालाच लाज कशी वाटत नाही? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

शेतकऱ्यांनी पाणी मागितले तर धरणात करंगळी वर केली, त्याची लाज कशी वाटत नाही? त्यामुळे "लाज कशी वाटत नाही?' हे विचारायलाच तुम्हाला लाज कशी वाटत नाही, असा थेट सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी  पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला केला. 

मुंबई - तुमच्या काळात कोट्यवधींचा सिंचन गैरव्यवहार केलात, त्याची लाज कशी वाटत नाही, आदर्श गैरव्यवहार केल्याने मुख्यमंत्रिपद गमवावे लागले, त्याची लाज कशी वाटत नाही, शेतकऱ्यांनी पाणी मागितले तर धरणात करंगळी वर केली, त्याची लाज कशी वाटत नाही? त्यामुळे "लाज कशी वाटत नाही?' हे विचारायलाच तुम्हाला लाज कशी वाटत नाही, असा थेट सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला केला. 

"लाज कशी वाटत नाही' अशी निवडणूक प्रचाराची टॅगलाइन करणाऱ्या कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस दुसऱ्याला इतकी निगरगट्टपणे लाज कशी वाटत नाही, असा सवाल कसा काय विचारू शकते, असा सवाल तावडे यांनी केला. ते म्हणाले, की गेल्या साडेचार-पाच वर्षांत आमच्या सरकारने विकासाची कामे केली, देशाची सुरक्षा वाढली; तसेच या काळात देशाची आर्थिक प्रगती झाली, त्याचा अभिमान कॉंग्रेस आघाडीला वाटला पाहिजे. ते सोडून केवळ राजकारणासाठी इतक्‍या निगरगट्टपणे कुठला पक्ष कसा प्रचार करू शकतो, याचे आश्‍चर्य वाटते. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या दहा वर्षांत बहुधा प्रथमच शरद पवार आणि अजित पवार यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्याचे वाचनात आले. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे मनापासून बोलले की निवडणुकीपुरते बोलले? निवडणुकीसाठी एकत्र आले म्हणून अजित पवार यांच्या बाजूने बोलण्याची नामुष्की त्यांच्यावर आली का, हे एकदा पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याला सांगावे, असा टोलाही तावडे यांनी लगावला. 

मोदींची चिंता चांगल्या हेतूनेच! 
शरद पवार यांना त्यांच्या घराण्याची काळजी करण्याचे काही कारण नाही, असे वाटत असले, तरीही रोहित काय करतो, पार्थ काय करतो, दादांचे वक्तव्य कसे असते, याची सर्व माहिती शरद पवार यांना असते. कुटुंबप्रमुख असल्याने ते त्यांच्या घरातील प्रश्‍न सोडवतीलच. मात्र, नरेंद्र मोदी पवार साहेबांविषयी चांगल्या गोष्टी बोलतात व राजकारणात ते आपल्याला मार्गदर्शक मानतात, त्यामुळे आपल्या कुटुंबाविषयी व्यक्त केलेली चिंता चांगल्या कारणासाठी आहे, असे मतही तावडे यांनी व्यक्त केले. 

लोकसभा 2019

Web Title: Comment on Vinod Tawde on Congress announcement