LokSabha 2019 : 'मनसे'ची शस्त्रे लगेच म्यान का झाली?

मृणालिनी नानिवडेकर
शनिवार, 23 मार्च 2019

- मनसेची अशी अवस्था का झाली?
- लोकसभेतून माघार घेतल्यानंतर विधानसभेसाठी राज ठाकरे कमाल दाखवू शकतील का?
- प्रादेशिक अस्मितेवर आधारलेलं राजकारण आता संपत चालले आहे का?


मांडा तुमचे मत!
पाठवा तुमचे मत webeditor@esakal.com वर आणि सब्जेक्टमध्ये लिहा 'माझे विश्लेषण'

'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ने लोकसभा निवडणुकीसाठी आपली शस्त्रे म्यान केली. या पक्षावर अशी वेळ का आली, हा पक्ष 'वन टाइम वंडर' ठरणार का, असे प्रश्‍न समोर आले आहेत. 

आपल्या प्रदेशावर झालेल्या अन्यायाची कहाणी मांडायची आणि त्यासाठी विवक्षित नेत्याला देवस्वरूप देत त्याच्या नेतृत्वाभोवती पर्यायी राजकारण बांधायचे, असा बहुतेक प्रादेशिक पक्षांचा खाक्‍या. तरुण वयातच राज ठाकरे यांना हे दोन्हीही साधले होते. तरीही ते आज 'नॉन प्लस' का झाले आहेत?

मतांची टक्‍केवारी जवळपास 11टक्‍के. लोकप्रियतेची ही लाट राज यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दर्शवणारी होती.

बंगाल, बिहार, ओडिशा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश प्रत्येक ठिकाणी प्रादेशिक पक्ष लक्षणीय कामगिरी बजावत असताना येथे असे का व्हावे? केवळ काही महिन्यांपूर्वी मोदींवर जहरी टीका करणाऱ्या, 'चौकीदार चोर है' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी बरोबरीचा मान मिळवत पुन्हा भाजपमय होणे पसंत केले. अशा वेळी खरे तर शिवसेनेने निर्माण केलेली पोकळी भरून काढायची मोठी संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे (मनसे) होती. पण राज ठाकरे यांनी निवडणूक लढवणार नाही, असे सांगत शस्त्रे म्यान केली आहेत.

भाजपतील स्थितीप्रियतेला कंटाळलेली, वाजपेयी अडवानी यांच्या ओसरलेल्या काळानंतर काही नवे काही घडत नसल्याने नाराज झालेली मतेही राज यांच्याकडे वळत होती.

2006मध्ये राज यांनी स्थापन केलेल्या 'मनसे'ने केवळ तीन वर्षांनी झालेल्या निवडणुकीत नेत्रदीपक कामगिरी केली होती. 2009मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 'मनसे'च्या उमेदवारांनी एका लाखावर मते घेतली. त्यामुळे शिवसेना-भाजपचे मुंबईतले सर्व उमेदवार पडले. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत 'मनसे'ने तब्बल 13 जागा जिंकल्या. मतांची टक्‍केवारी जवळपास 11टक्‍के. लोकप्रियतेची ही लाट राज यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दर्शवणारी होती.

'शोमन' अशी त्यांची हेटाळणी योग्य की कशी, या मतावर त्यांचे टीकाकारही काहीकाळ घुटमळत होते. शिवसेनेसमोर तर त्यांनी मोठे आव्हान उभे केले होतेच; पण भाजपतील स्थितीप्रियतेला कंटाळलेली, वाजपेयी अडवानी यांच्या ओसरलेल्या काळानंतर काही नवे काही घडत नसल्याने नाराज झालेली मतेही राज यांच्याकडे वळत होती. मते 'मनसे'कडे जावू नयेत, यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू होते.2010मध्ये झालेल्या मुंबईच्या उंबरठ्यावरच्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत 'मनसे'ने 106पैकी 26जागा घेतल्या. बऱ्याच ठिकाणी निसटता पराभव स्वीकारावा लागला. 'मनसे'ला गंभीरपणे घेतले जावू लागले. 2011मध्ये राज ठाकरे स्वत:हूनच शिष्टमंडळासह गुजरात पाहणीला गेले. हाच तो बहुचर्चित मोदीस्तुती दौरा. शिवसेनेला मागे टाकून भाजपतील उगवत्या ताऱ्याने 'मनसे'कडे लक्ष द्यावे, असा त्यामागचा उद्देश असू शकतो. त्यानंतर लगेचच झालेल्या 2012च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही 'मनसे'ला उत्तम यश मिळाले.

महाराष्ट्राच्या विकासाची ताकदवान ब्लूप्रिंट लोकांसमोर मांडत पेशन्सची लढाई लढण्याऐवजी राज यांनी ज्या मोदींवर स्तुतिसुमने उधळली, त्यांनाच लक्ष्य करणे सुरू केले.

महाराष्ट्राच्या नागरी भागाने राज यांना आपला मानले होते. नाशिकात 122पैकी 40, पुण्यात 152पैकी 29 असे संख्याबळ मिळवत राज लक्षणीय ठरत होते. मोदींना नेता मानणे जनतेला आवडले असेलही; पण न मागताच निष्ठा अर्पण करण्याचे कारण काय ते समजत नव्हते. झपाट्याने वाढलेल्या पक्षाने संघटनाबांधणीकडे अजिबात लक्ष न दिल्याने प्रभावाचा गुणाकार होत नव्हता. राज हे एकमेव शक्तिस्थान. त्यांना गाडून घेत काम करण्याची सवय नाही. त्यामुळे त्यांची शैली आणि आक्रमक वक्‍तृत्व वगळता सारेच रंग उडू लागले होते. 'वन टाइम वंडर' पक्षाचे असेच होत असावे. त्यातच मोदी स्वत:च भाजपच्या केंद्रस्थानी आले, अन कुंपणावरचे मत परत भाजपकडे परतले. शिवसेनेलाही विचारायचे नाही, असा मोदी-शहा जोडीचा त्या वेळी खाक्‍या होता. 'मनसे' गैरलागू ठरली. तरीही 2014 मध्ये ढिसाळ पक्षीय व्यवस्थापन आणि मोदी लाट यातही मनसेच्या उमेदवारांना मुंबई उत्तर -पश्‍चिम (महेश मांजरेकर 66 हजार) दक्षिण- मध्य ( आदित्य शिरोडकर 73 हजार) ठाणे (अभिजित पानसे 48 हजार) पुणे (दीपक पायगुडे 93 हजार) अशी मते मिळत गेली. 

'लोकसभेत घरी बसू अन्‌ विधानसभेत लढू' हे मनसैनिकांना चालेल काय ? शिवाय एकेकाळी मोदींना मानणारे आपले नेते आता कॉंग्रेस राष्ट्रवादीकडे झुकताहेत, हे तरी मान्य होईल काय?

'अँग्री यंग मॅन'ला झटपट निकाल हवा. व्यवस्था बदलणे सिनेमासारखे नसते. राज यांना ते समजत नसावे. आपले राजकीय स्थान नेमके काय आहे या प्रश्‍नाने त्यांना अस्वस्थ केले असावे. महाराष्ट्राच्या विकासाची ताकदवान ब्लूप्रिंट लोकांसमोर मांडत पेशन्सची लढाई लढण्याऐवजी राज यांनी ज्या मोदींवर स्तुतिसुमने उधळली, त्यांनाच लक्ष्य करणे सुरू केले. गुजरातेत मला विशिष्ट भाग दाखविण्यात आला, असा दावा त्यांनी परवा केला; पण दुसरी बाजू बघणे आवश्‍यक आहे हे त्यांना समजले कसे नाही ?

न मागताच दिलेला पाठिंबा कामाचा नसतो. राष्ट्रवादी कॉंग्रेसला हे माहीत झाले असावे. आता मोदीविरोधासाठी राज यांचा वापर होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या राज यांच्यावर प्रभाव टाकताना दिसतात. राज यांनी बालाकोट हल्ल्यावर जी टीका केली ती फार टोकाची होती. त्यात तारतम्य नव्हते, असे मोदीभक्‍तांना वाटते. एकेकाळी राज यांना ज्या मतदारांनी पाठिंबा दिला त्यांना हे मान्य होईल काय? कार्यकर्त्यांना कार्यक्रम हवा असतो. तो गुजरात्यांना नावे ठेवा, पाणीपुरीवाल्यांना झोडा, भय्यांना नावे ठेवा असाच असावा काय, हा वेगळा विषय पण काहीतरी तर असावा. शिवसेनाही प्रारंभीच्या वर्षात कॉंग्रेसनेत्यांनी वापरली. आठवा 'वसंतसेना' ही टीका. पण त्याच वेळी बाळासाहेबांनी काही कार्यक्रम राबवले. मराठी माणसाला भावनिक आधार दिला. आता परिस्थिती बदलली आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होईलच असे नाही. 'लोकसभेत घरी बसू अन्‌ विधानसभेत लढू' हे मनसैनिकांना चालेल काय ? शिवाय एकेकाळी मोदींना मानणारे आपले नेते आता कॉंग्रेस राष्ट्रवादीकडे झुकताहेत, हे तरी मान्य होईल काय?

राज ठाकरेंविषयीची प्रत्येक बातमी वाचा

........................................................

- मनसेची अशी अवस्था का झाली?
- लोकसभेतून माघार घेतल्यानंतर विधानसभेसाठी राज ठाकरे कमाल दाखवू शकतील का?
- प्रादेशिक अस्मितेवर आधारलेलं राजकारण आता संपत चालले आहे का?

मांडा तुमचे मत!
पाठवा तुमचे मत webeditor@esakal.com वर आणि सब्जेक्टमध्ये लिहा 'माझे विश्लेषण'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Downfall of Raj Thackeray raises concerns over fate of Maharashtra Navnirman Sena