Loksabha 2019 : भाजपचा जाहीरनामा हा एक जुमलाच - चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

‘भाजपचा जाहीरनामा म्हणजे एक जुमलाच आहे,’’ अशी टीका करून ‘‘पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांचे काय झाले, कुठे आहेत अच्छे दिन,’’ असा प्रश्‍न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केला. ‘‘काँग्रेसचा जाहीरनामा हा जनतेचा जाहीरनामा आहे, तर न्याय योजना ही जाहीरनाम्याचा आत्मा आहे,’’ असेही ते म्हणाले.

पुणे - ‘भाजपचा जाहीरनामा म्हणजे एक जुमलाच आहे,’’ अशी टीका करून ‘‘पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांचे काय झाले, कुठे आहेत अच्छे दिन,’’ असा प्रश्‍न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केला. ‘‘काँग्रेसचा जाहीरनामा हा जनतेचा जाहीरनामा आहे, तर न्याय योजना ही जाहीरनाम्याचा आत्मा आहे,’’ असेही ते म्हणाले.

पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारासाठी चव्हाण पुण्यात आले होते. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका केली. 

या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, दीप्ती चवधरी, अभय छाजेड, कमल व्यवहारे आदी उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट, विखे यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेली चर्चा, राज ठाकरे यांच्या सभा आदी विषयांवर त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले.

‘कारवाईची भाषा भाजपकडून वारंवार केली जात आहे. कारवाई करण्यापेक्षा त्याचा वापर राजकारणासाठी केला जात आहे, हादेखील एक गुन्हाच आहे,’’ असेही चव्हाण यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले; तर राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार झाला असून, या प्रकरणाची चौकशी कोणत्याही परिस्थितीत होणारच, असा दावाही त्यांनी केला.

पक्षाच्या जाहीरनाम्याबद्दल बोलताना चव्हाण म्हणाले, ‘‘इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा दिला होता. त्या वेळी देशात गरिबांची संख्या ७४ टक्के होती. काँग्रेसने वेळोवळी घेतलेले निर्णय, केलेल्या आर्थिक सुधारणा यामुळे ही संख्या वीस टक्‍क्‍यांवर आली आहे. त्यामुळे गरिबी हटावच्या विरोधात ही अंतिम लाढाई आहे. त्यासाठीच न्याय योजना काँग्रेसने जाहीर केली आहे.

दोन टप्प्यांत ही योजना राबविण्यात येणार असून, त्यासाठी दरवर्षी ३ लाख ६० हजार कोटी रुपये लागणार आहेत. ते कसे उभे करावयाचे, याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय शिक्षण, रोजगार, शेती आणि महिला अशी अंमलबजावणी होऊ शकते, अशा योजनांचा समावेश जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.’

Web Title: Loksabha Election 2019 BJP Declaration Prithviraj Chavan Politics