Loksabha 2019 : आता फार झाले, सरकार बदलाच - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

ऊर्मिला मातोंडकरांची पवारांशी चर्चा
मुंबई - उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आणि प्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मातोंडकर सध्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही मातोंडकर यांनी भेट घेतली. पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी दोघांची भेट झाल्याचे समजते.

नाशिक - केंद्रातील भाजप सरकारला शेती आणि शेतकऱ्यांविषयी आस्था नाही. शेतमालाला भाव मिळण्यापासून ते शेतकऱ्यांच्या मुलाबाळांच्या भवितव्याविषयी विचार केला जात नाही. आता फार झाले, असा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बळिराजाला सन्मानाने जगू न देणारे सरकार बदलावे लागेल, असे ठणकावून सांगितले.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी सय्यद पिंप्री येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते. काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

सय्यद पिंप्रीचे भूमिपुत्र तथा माजी खासदार (कै.) ॲड. उत्तमराव ढिकले यांच्या आणि शरद जोशी व इतरांनी नाशिकमधून सुरू केलेल्या शेतकरी आंदोलनाची आठवण सांगून पवार म्हणाले की, शेतीमालाच्या प्रश्‍नावर केंद्रीय कृषिमंत्री म्हणून उत्तर शोधत असताना शेतीच्या अर्थशास्त्राची माहिती नाशिकच्या शेतकऱ्यांकडून मिळत होती. नावीन्यपूर्ण शेती करण्याकडे इथले शेतकरी अग्रेसर आहेत. केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना आम्ही खाणाऱ्यांचा आणि पिकवणाऱ्याचा विचार केला. गहू, तांदळाच्या किमती शेतकऱ्यांना वाढून मिळत असताना गरिबाला तीन रुपये किलो भावाने तांदूळ आणि दोन रुपये किलो भावाने गहू उपलब्ध करून दिला. आता, मात्र सरकार खूप बोलते; पण काहीच करत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत.

आईच्या संस्कारामुळे कुटुंब एकत्र
पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पवार यांनी आईचे संस्कार असल्याने आमचं मोठं कुटुंब एकत्र आहे, असे सांगितले. तसेच मोदींचे वेगळे आहे. एकटाच गडी असल्याने त्यांना नाती कशी कळणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, ‘‘देशाने चुकून मागील पाच वर्षांमध्ये सत्ता दिली. त्यांचा अनुभव पाहिला. आता तुम्हाला संधी मिळेल असे दिसत नाही. त्यामुळे सांगायला काही नसल्याने माझ्यावर टीका केली जात आहे. माझा पुतण्या पक्ष ताब्यात घ्यायला लागला, असे मोदी म्हणाले. मात्र पक्ष कुण्या एकाचा नसतो. कार्यकर्त्यांच्या कष्टातून उभा राहत असतो, हे ध्यानात ठेवावे.’’

Web Title: Loksabha Election 2019 BJP NCP Sharad Pawar Government Politics