Loksabha 2019 : कोल्हापुरातून प्रचाराचे बाण

Fadnavis-Thackeray
Fadnavis-Thackeray

मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पश्‍चिम महाराष्ट्रातील पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातून शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचे बाण सुटणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या २५ रोजी युतीची पहिली संयुक्त प्रचारसभा येथे होईल. 

आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सध्या मुंबईत सर्वपक्षीयांच्या जोरबैठका सुरू असून, संभाव्य जागावाटपाबरोबरच आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी खल सुरू आहे. भाजपमध्ये अनेक विद्यमान खासदारांना यंदा डच्चू मिळण्याची शक्‍यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादीही उद्या (ता. १४) रोजी जाहीर होऊ शकते.

मागील पाच वर्षांत केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहूनही एकमेकांवर तुटून पडण्याची संधी न सोडणारे शिवसेना- भाजपचे नेते आता लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत.  युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूर येथे येत्या २५ रोजी फोडणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे युतीच्या प्रचाराची सभा होणार आहे. 

याबाबतचा निर्णय फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत घेण्यात आला असून, याबाबतचे संयुक्‍त पत्रक भाजप- शिवसेनेने काढले आहे. युतीच्या प्रचाराला प्रारंभ होण्यापूर्वी युतीच्यावतीने संयुक्‍त मेळावे आणि सभा घेण्यात येणार आहेत. यामध्ये शुक्रवारी (ता. १५) सकाळी पश्‍चिम विदर्भातील अमरावती येथे, तर सायंकाळी पूर्व विदर्भात नागपूर येथे, रविवारी (ता. १७) सकाळी औरंगाबाद येथे, तर सायंकाळी नाशिक येथे, सोमवारी (ता. १८) पुण्यात, तर सायंकाळी नवी मुंबई येथे संयुक्‍त सभा होणार आहेत.

भाजप नेत्यांवर टांगती तलवार
सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर नगरचे भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट झाला आहे. गांधी यांच्याप्रमाणेच आणखी काही खासदारांची तिकिटे भाजपकडून कापली जाणार असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. यामध्ये सोलापूर, लातूर या दोन मतदारसंघांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने भाजपच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघासाठी संभाव्य नावांची शिफारस केंद्रीय कार्यकारिणीला पाठवली जाणार आहे. नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे युवा नेते सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना नगर लोकसभेची उमेदवारी दिली जाणार आहे. यामागे दिलीप गांधी यांची कामगिरी कारणीभूत नाही, तर आगामी विधानसभेचे राजकारण कारणीभूत असल्याचे भाजपकडून सांगण्यात येते. मात्र सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्‍यता आहे. या ठिकाणी डॉ. जय सिद्धेश्‍वर महास्वामी यांना तिकीेट देण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. अक्‍कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा या चार मतदारसंघांत या स्वामींना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे बनसोडे यांचा पत्ता कट केला जाणार असल्याचे समजते. भाजपमध्ये तिकिटे देताना निवडून येण्याची क्षमता विचारात घेतली जाते. त्यानंतर उमेदवारांचा सर्वे करून त्याच्या ताकदीचा अंदाज घेऊन तिकिटे दिली जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com