Loksabha 2019 : काँग्रेसला लाज कशी वाटली नाही? - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

सैनिकांच्या विषयावर टाळ्यांची दाद
मुख्यमंत्र्यांनी भाषणात २००८ मध्ये मुंबईत व आता पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. या दोन्ही हल्ल्यांमध्ये काय फरक आहे, हे त्यांनी सांगितले. यामध्ये आपल्या सैनिकांनी चोख कामगिरी केल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केल्यावर उपस्थितांनी त्याला टाळ्यांनी दाद दिली. विकासाचे अनेक मुद्दे त्यांनी मांडले. पण, त्याला लोकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. पण, सैनिकांच्या मुद्द्यांवर उपस्थितांनी केलेल्या टाळ्यांच्या कडकडाटाचे मुख्यमंत्र्यांनाही आश्‍चर्य वाटले.

सोलापूर - देशातील गरिबी हटविण्याची पहिली घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आजोबांनी केली होती. त्यानंतर अनेक वर्षांनी काँग्रेसच्या अध्यक्षांना पुन्हा ‘गरिबी हटाव’ची घोषणा करताना लाज कशी वाटली नाही, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या प्रचारासाठी अक्कलकोट येथे आज विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, की काँग्रेसने केलेले घोषणापत्र खोटारडे आहे. देशातील लोक त्याला भुलणार नाहीत. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की ते आपल्या भाषणात काय बोलतात, हे कळतच नाही. टीव्हीवर ज्या पद्धतीने एखाद्या मालिकेपूर्वी या कार्यक्रमाचा काही संबंध प्रत्यक्षात कुणाच्या आयुष्यात आला, तर तो योगायोग समजावा, असे दाखविले जाते. नेमके त्याच पद्धतीने केवळ मनोरंजन करणारे भाषण राहुल करतात.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कलम १२४ अ हे रद्द करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. हे कलम देशद्रोहाच्या गुन्ह्यासंबंधी आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे हा जाहीरनामा काँग्रेसचा नसून ‘जैशे महंमद’ याचा असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.

Web Title: Loksabha Election 2019 Congress Devendra Fadnavis Politics