Loksabha 2019 : मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने काम करा - के. सी. वेणुगोपाल

मुंबई - संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या प्रसंगी पक्षाचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण आणि के. सी. वेणुगोपाल आदी उपस्थित होते.
मुंबई - संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या प्रसंगी पक्षाचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण आणि के. सी. वेणुगोपाल आदी उपस्थित होते.

मुंबई - महाराष्ट्रासारख्या क्रमांक दोनच्या जागा असलेल्या राज्यात काँग्रेस पक्षामध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना व्यथित करणारे आहे. आपापले मतदारसंघ शाबूत ठेवायचे असतील तर एकदिलाने काम करा. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुका येत आहेत हे लक्षात ठेवा; असा सज्जड दमवजा इशारा आज काँग्रेसश्रेष्ठींनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला. राहुल गांधी यांचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्‍तिश: प्रत्येक महत्त्वाच्या नेत्याशी चर्चा केली.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह महाराष्ट्रातला प्रत्येकच नेता नाराज आहे. जागोजागी झालेली बंडखोरीची लागण, सांगलीसारख्या बालेकिल्ल्यात पक्षाला उमेदवार न मिळणे, पुण्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागेबाबत अद्याप घोळ सुरू असणे, तसेच काँग्रेसनिष्ठ घराण्याने उठाव करण्याच्या प्रकाराबद्दल पक्षश्रेष्ठी चिंतीत आहेत. अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष या नात्याने आधीपासून मोर्चेबांधणी केली नाही, अशी कैफियत राज्यातील काही बड्या नेत्यांनीही श्रेष्ठींसमोर मांडल्याचे समजते. त्यावर ही एकदिलाने काम करण्याची वेळ आहे, लवकरच विधानसभा निवडणुका येत आहेत ते कसे विसरता? आपापली संस्थाने, मतदारसंघ शाबूत ठेवायचे असतील तर एकदिलाने काम करा, असे समजावून सांगण्यात आले. संजय निरूपम यांच्यापाठोपाठ अशोक चव्हाण हटाव अशी मोहीम छुप्या स्वरूपात सुरू करण्याचा काही जणांचा मानस असल्याचेही सांगितले जात होते. पण आज त्यावर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न झाला.

मिस्त्रींचे लक्ष
दिल्लीतून मधुसूदन मिस्त्री यांना महाराष्ट्राकडे लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत पाठविण्यात आले आहे. ते सर्वतोपरीने मदत करतील असेही सांगण्यात आले आहे. आज बैठकीत तक्रारीचा सूर लागू नये याचीही वरिष्ठ नेत्यांनी रात्रीपासून काळजी घेतली होती. महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीत काँग्रेसने केवळ दोन जागा जिंकल्या होत्या. ती वेळ पुन्हा येऊ देऊ नका, अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात आली असल्याचेही विश्‍वसनीय सूत्रांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याबरोबरच महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे स्वत: निवडणूक लढवत असल्याने आधीच चिंतेचा प्रदेश झालेल्या महाराष्ट्राकडे लक्ष देणे काँग्रेससाठी अधिकच आवश्‍यक झाले आहे.

सांगलीतून विशाल पाटील
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघातून अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील लढणार आहेत. काँग्रेसने ही जागा स्वाभिमानीसाठी सोडली होती. तथापि, ही जागा काँग्रेसकडूनच लढणार, अन्यथा अपक्ष म्हणून लढणार असा निर्धार पाटील यांनी केला होता. 

रावेरमधून डॉ. उल्हास पाटील
जळगाव - रावेर लोकसभा मतदारसंघातील आघाडीचा उमेदवार निश्‍चितीचा तिढा सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर  ही जागा काँग्रेसला   सोडली असून, काँग्रेसने माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची उमेदवारी येथून घोषित केली आहे.

प्रवीण गायकवाड काँग्रेसमध्ये
मुंबई - संभाजी ब्रिगेड - मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष, आक्रमक व अभ्यासू अशी प्रतिमा असलेले प्रवीण गायकवाड यांनी हजारो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने काँग्रेसला मराठा मोर्चाचे पाठबळ मिळण्याची शक्‍यता आहे.

काँग्रेस पक्ष एकसंधपणे निवडणूक लढतो आहे, मोदीविरोधातला कौल महाराष्ट्राच्या मतपेटीतून बाहेर येईल.
- सचिन सावंत, प्रवक्‍ते, काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com