Loksabha 2019 : काँटे की टक्कर

निखिल पंडितराव
मंगळवार, 16 एप्रिल 2019

मतदारसंघातील प्रश्‍न
    बेरोजगार तरुणांना स्थानिक पातळीवर नोकरी नाही 
    कोल्हापुरात मोठा उद्योग उभा करणे 
    रेल्वे आणि विमानसेवेचा विस्तार 
    शेतकऱ्यांच्या उसाला, शेतमालाला हमीभाव मिळणे 

कोल्हापूर मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत आहे. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्यासमोर युतीचे प्रा. संजय मंडलिक यांचे कडवे आव्हान आहे. सतेज पाटील यांची असहकाराची भूमिका आणि नाराजी किती प्रमाणात दूर होते, कार्यकर्ते काय निर्णय घेणार, यावर सर्व अवलंबून आहे.

लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात विद्यमान खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्यामध्ये काँटे की टक्कर असल्याचे चित्र सध्या आहे. २०१४ च्या निवडणुकीत आमने-सामने ठाकलेल्यांच उमेदवारांमध्ये या वेळीही लढत आहे. देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असताना कोल्हापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक वादळात दिवा लावला त्याप्रमाणे विजयी झाले. परंतु, यंदाच्या निवडणुकीत त्यांना आघाडीमधील आणि पक्षांतर्गत नाराजीला सामोरे जावे लागत आहे. 

गत निवडणुकीत मदत करूनही विधानसभेच्या निवडणुकीवेळी आपल्या पराभवास महाडिक कारणीभूत असल्याचे सांगत काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य आमदार सतेज पाटील यांनी उघड बंड पुकारले आहे. जिल्ह्यात त्यांना मानणारा गट हा शिवेसना-भाजपचे उमेदवार प्रा. मंडलिक यांच्या प्रचारातच दिसतोय. काही गट उघडपणे प्रा. मंडलिकांबरोबर जाणार असल्याचे जाहीर करीत आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, राज्याचे उपाध्यक्ष पी. एन. पाटील सोडले, तर बाकीचे काँग्रेसचे सर्व जण निवडणुकीपासून लांबच आहेत. महाडिकांना पक्षांतर्गत आणि काँग्रेसमधील नाराजी दूर करीत प्रचाराची धुरा सांभाळावी लागत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी प्रचार करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना योग्य तो संदेश दिला आहे, परंतु त्याचे मतात रूपांतर होण्याची शक्‍यता कमी दिसत आहे. 

प्रा. मंडलिक यांच्यासाठी शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते काम करताना दिसत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपची सर्व प्रचार यंत्रणा प्रा. मंडलिक यांच्या पाठीशी उभी केली आहे. भाजपचे बूथचे नेटवर्क यासाठी अधिक प्रभावीपणे वापरले जात आहे. शिवसेना-भाजपमधील नाराज गटही विरोधी उमेदवार महाडिक यांच्या प्रचारात छुप्या पद्धतीने उतरलाय. त्यामुळे दोन्ही उमेदवारांचा एकमेकांच्या पक्षातील अंतर्गत नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

पक्षापेक्षा आता गटतटाच्या राजकारणाला महत्त्व आले आहे. उमेदवारांची तुलना करून गटतटावर निवडणुकीची प्रचार यंत्रणा दोन्ही उमेदवारांकडून वापरली जात आहे. गोकुळ, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (केडीसीसी), जिल्हा परिषद, महापालिका यातील राजकारणानुसार विविध पातळ्यांवर मतांची गणिते आखली जात आहेत, त्यानुसारच उमेदवार आपली व्होटबॅंक पक्की करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकूणच दोन्ही उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Dhananjay Mahadik Sanjay Mandlik Politics