Loksabha 2019 : ‘गेस्ट आर्टिस्ट’मुळे रखडली भाजपची दिल्ली यादी

Kamal
Kamal

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील सात उमेदवारांची यादी केवळ एक- दोन नावांमुळे रखडल्याची माहिती आहे. नुकताच भाजपवासी झालेला क्रिकेटपटू गौतम गंभीर याला नवी दिल्ली मतदारसंघातूनच तिकीट देण्यासाठी एका दरबारी नेत्याने धरलेला आग्रह, एका पॉवरफुल धार्मिक बाबाच्या चेल्याची पुन्हा खासदार होण्याची हाव व याबाबत स्थानिक दिल्लीकर नेत्यांची तीव्र नाराजी यातून भाजपची यादी रखडल्याचे सांगितले जाते. उद्या (ता. २५) होणाऱ्या भाजप निवडणूक समितीच्या (सीईसी) बैठकीनंतर  दिल्लीचे सात उमेदवार जाहीर होतील अशी चिन्हे आहेत. 

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये उड्या मारून थेट तिकिटे बळकावणारे हे ‘गेस्ट आर्टिस्ट’ पक्षात नकोतच, असे वारंवार सांगणाऱ्या याच नेत्याने गंभीरच्या उमेदवारीसाठी बॅटिंग सुरू केल्याचे चित्र आहे. गंभीरसाठी ज्या नवी दिल्ली मतदारसंघाचा आग्रह धरला जात आहे, तेथून खासदार मीनाक्षी लेखी व दिल्लीचे प्रभारी श्‍याम जाजू यांच्या नावांची शिफारस  असतानाही गंभीर यालाच तिकीट देण्यासाठी हा दरबारी नेता आपली चाणक्‍यनीती पणाला लावत असल्याचे सांगितले जाते. 

शुक्रवारी उमेदवार ठरविण्यासाठी दिल्ली भाजपची निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत बैठक सुरू होती, त्याच वेळी राष्ट्रीय मुख्यालयात गंभीर याच्यासाठी पायघड्या घातल्या जात होत्या. 

मात्र, प्रदेश भाजपने आपली तीन तीन नावांची शिफारस आधीच पाठविल्याने ‘सीईसी’ला त्याच आधारावर विचार करावा लागणार ही तांत्रिक अडचण, हाच जाजू व लेखी यांच्यासाठी दिलासा जातो. याच बैठकीत ‘अशा संधीसाधू आयारामांना भाजपने अजिबात तिकिटे देऊ नयेत, त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांत चुकीचा संदेश जातो,’ असे मत अनेकांनी मांडल्याचेही समजते.

भाजप कार्यकर्त्यांची हतबलता 
गौतम गंभीरच्या पाठीमागे असणाऱ्या नेत्याचे वजन पाहून श्‍याम जाजू यांनी चांदणी चौकातूनही प्रयत्न चालविल्याची माहिती आहे. येथून माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. हर्ष वर्धन यांना तिकीट देण्याचे पक्षनेतृत्वाच्या मनात असले तरी हर्ष वर्धन यांना पूर्व दिल्ली मतदारसंघ हवा आहे. मात्र, तेथे एका पॉवरफुल धार्मिक बाबाच्या खासदार चेल्याने आधीच फिल्डिंग लावून ठेवली आहे. या खासदाराची कामगिरी सुमार असून स्थानिक भाजप कार्यकर्त्यांत त्याच्याविरुद्ध प्रचंड चीड आहे. मात्र पॉवरफुल बाबासमोर कोणाचे काय चालणार, असा हताश प्रश्‍न पूर्व दिल्लीच्या भाजपेयींच्या मनात निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com