Loksabha 2019 : कोल्हापूर, सांगलीतील लढाई स्वकीयांशीच!

डॉ. श्रीरंग गायकवाड
शनिवार, 23 मार्च 2019

राज्याच्या राजकारणात कोल्हापूर आणि सांगली हे पश्‍चिम महाराष्ट्रातील मतदारसंघ युती आणि आघाडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे. त्यामुळेच त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून होत आहे; परंतु विरोधकांशी लढण्याआधी येथील उमेदवारांना स्वकीयांशीच लढावे लागेल, असे सध्याचे चित्र आहे.

राज्याच्या राजकारणात कोल्हापूर आणि सांगली हे पश्‍चिम महाराष्ट्रातील मतदारसंघ युती आणि आघाडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे. त्यामुळेच त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून होत आहे; परंतु विरोधकांशी लढण्याआधी येथील उमेदवारांना स्वकीयांशीच लढावे लागेल, असे सध्याचे चित्र आहे.

रविवारी (ता. २४) शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरमधील तपोवन मैदानावर फुटणार आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीनेदेखील कोल्हापुरातूनच प्रचाराची सुरुवात व्हावी, यासाठी नियोजन सुरू केले आहे. यामुळे राज्याच्या राजकारणातील कोल्हापूरचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे युतीकडून शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांचीही उमेदवारी नक्की झाली आहे. या दोन्हीही उमेदवारांना विरोधी पक्षांपेक्षा स्वकीयांशीच लढण्यात मोठी शक्ती खर्च करावी लागणार आहे. असेच चित्र हातकणंगले आणि सांगली लोकसभा मतदारसंघांतही आहे.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांना निवडून आणण्यासाठी जोर लावला. मात्र, आमदारकीच्या निवडणुकीत धनंजय यांनी भाऊ अमल यांच्यासाठी प्रयत्न केल्याने आपला पराभव झाला, असा आरोप सतेज यांनी केलाय. आता खासदारकीच्या निवडणुकीत ज्यांनी आपला विश्‍वासघात केला, त्यांना मदत करायची नाही, असे सांगत शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.

दुसरीकडे कोल्हापूरच्या राजकारणात ‘शिवसेना-भाजप-काँग्रेस’ पॅटर्न आकाराला आला आहे. हा पॅटर्नच लोकसभा निवडणुकीत मला खासदार म्हणून निवडून आणेल,’ असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक व्यक्त करत आहेत. आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचे भाऊ, भाजपचे आमदार अमल महाडिक आणि वहिनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक हे दोघे युतीचाच प्रचार करतील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना द्यावी लागली. 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी धनंजय यांच्या उमेदवारीलाच विरोध केला होता. आता धनंजय यांनाच निवडून आणणार, असे सांगत असले तरी, त्यांचे कार्यकर्ते वेगळेच बोलत आहेत. त्यामुळे महाडिक यांची बरीचशी शक्ती स्वकीयांशीच लढण्यात जाईल, असे चित्र आहे.

जागा काँग्रेसचीच
सांगली मतदारसंघात उमेदवारी मिळण्यावरून काँग्रेसचे दिवंगत नेते वसंतदादा पाटील आणि पतंगराव कदम गटाच्या लोकांनी ओढाताण चालवली आहे. ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देऊन या वादामधून सुटका करून घेण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार आहे; पण काँग्रेसमधील एका गटाचा याला विरोध आहे. गेली ४० वर्षांची ही हक्काची जागा काँग्रेसलाच मिळावी, असा आग्रह या गटाने धरला आहे. भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. परंतु खासदार झाल्यानंतर या मूळच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्याने आपल्याच कार्यकर्त्यांना बळ दिल्याची नाराजी जिल्ह्यातील भाजपच्या चार आमदारांमध्ये आहे. नुकतीच बैठक बोलावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला; परंतु गाव आणि कार्यकर्ता पातळीवर ही नाराजी कितपत दूर होईल, याबाबत साशंकताच आहे. त्या अर्थाने संजय पाटील यांनाही स्वकीयांशीच लढावे लागणार आहे.

हातकणंगलेत चुरस
हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या उमेदवारीला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिंबा दिलाय. उमेदवारीचे वचन घेऊन राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले युवक नेते धैर्यशील माने शेट्टींच्या विरोधातील उमेदवार असतील. याशिवाय स्वाभिमानीचे खुद्द हातकणंगले तालुक्‍याचे अध्यक्ष शिवाजी माने काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांसह बाहेर पडले आणि त्यांनी ‘जय शिवराय किसान मोर्चा’ नावाने वेगळी चूल मांडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Kolhapur Sangli Politics