Loksabha 2019 : वाघाचे दात मोजणारे मनोमिलन!

Konkan-Constituency
Konkan-Constituency

रायगड, पालघर, ठाणे, कल्याण, भिवंडी या मुंबईनजीकच्या लोकसभा मतदारसंघांत सर्वाधिक चर्चा सध्या पालघरची आहे. कोण जिंकणार, कोण हरणार यापेक्षाही युतीमध्ये मनोमिलन नेत्यांचे नेत्यांशी झाले आणि कार्यकर्त्यांच्या भावभावनांची प्रतारणा करण्यात आली, याची चर्चा रंगू लागली आहे.

भाजप आणि शिवसेनेत वाटाघाटी झाल्या. पुढच्या विधानसभेसाठीही एकत्रच लढण्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या. एकाच बैठकीत सारे रुसवे-फुगवे संपले. गळा काढून एकमेकांवर तोंडसुख घेणाऱ्यांची गळाभेटही झाली. पालघरचे काय, हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार, हेही स्पष्ट झाले.

भाजप बॅकफूटवर गेली आणि शिवसेना वाटाघाटीत जिंकली. फक्त नऊ महिन्यांपूर्वी याच पालघरमध्ये अतिप्रतिष्ठेची लोकसभा पोटनिवडणूक शिवसेना हरली. भाजपने ती जिंकली. शिवसेनेच्या हरलेल्या उमेदवाराचे नाव होते - श्रीनिवास वनगा. जिंकले होते डॉ. राजेंद्र गावित. जिंकलेला उमेदवार बेघर होईल आणि शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांचे खासदार होण्याचे स्वप्न साकार होईल, असे जवळपास साऱ्यांनाच वाटत होते; पण वाटाघाटी फक्त नेत्यांनी नेत्यांसाठी केल्या. लोकसभा लढण्याची वनगा यांना इच्छा नाही, त्यांना विधानसभेला तिकीट देण्यात येईल, असे सांगून शिवसेनेला पोटनिवडणुकीत हरवलेल्या उमेदवारासाठी ‘मातोश्री’चे दार उघडले गेले. शिवबंधन बांधण्यात आले. या वाटाघाटी, हे मनोमिलन कार्यकर्त्यांसाठी नसून, ते फक्त नेत्यांचे नेत्यांशी आहे, अशी टीका शिवसेनेचे कार्यकर्तेच नव्हे, तर पदाधिकारीही आता करू लागले आहेत.

सल शिवसैनिकांची
वनगा यांना पालघरमध्ये लढवायचेच नव्हते, तर शिवसेनेने ही जागा आपल्या वाट्याला घेतलीच कशाला, असा थेट प्रश्‍न शिवसैनिक आता विचारू लागले आहेत. गावितांचा विजय झाल्यास लोकसभेत शिवसेनेची एक जागा वाढेलही; पण कार्यकर्त्यांच्या मनातली सल कधीच भरून निघणार नाही. लोकसभेतली संख्या वाढवण्यापेक्षा, त्या बदल्यात विधानसभेसाठी सहा जागा मागून घेतल्या असत्या तर ते संख्याबळ सत्तेत बरोबरीचा वाटा घेण्यापेक्षा शिवसेनेला सर्वाधिक वाटा मिळवण्याची ताकद कमावता आली असती; पण हा बोटचेपेपणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत कुठून आला? असा सवाल आहे. डरकाळी फोडणाऱ्या वाघांच्या तोंडात हात घालून दात मोजण्याची धमकी देणाऱ्यांचाच हा विजय आहे, असे समजायचे का? या प्रश्‍नाने शिवसैनिक अस्वस्थ आहेत.

पालघरच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या मनात असलेली ही अस्वस्थता आता सार्वत्रिक झाली आहे. मोठा भाऊ म्हणतच भाजपची ही ‘दादागिरी’ सुरू आहे. एकत्र लढण्याच्या आणाभाका घेऊन, शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा डाव मांडला जात आहे. या खेळात वनगांसारख्या प्याद्यांचे स्वप्न भंग होत असून, सच्चे शिवसैनिक असल्याने बोलताही येत नाही आणि सोडताही येत नाही, अशी कार्यकर्त्यांची अवस्था झाली आहे. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार नसेलही; पण ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत, तिथे मित्रपक्ष म्हणून किती सहकार्य करायचे, हा प्रश्‍न शिवसैनिकांच्या मनात घर करत आहे. दुसरीकडे जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत, तिथे भाजपच्या नेत्यांना आपण काय करायचे, असा प्रश्‍न विचारणारे कार्यकर्ते आहेतच.

युतीचे पाचही खासदार उमेदवार
ठाणे, कल्याण, भिवंडी, रायगड आणि पालघर या पाचही मतदारसंघात युतीचे पाचही उमेदवार विद्यमान खासदार आहेत. ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यात थेट लढत आहे. भाजपचे कार्यकर्ते किती मदत करतात, यावर शिवसेनेचे भविष्य अवलंबून आहे. काँग्रेसमधील रुसवे-फुगवे त्रासदायक ठरणार नाहीत, याची काळजी राष्ट्रवादीला आहे. ही लढत एकतर्फी वाटत असली तरी होळीदरम्यान ‘मनसे’ने राष्ट्रवादीबरोबर दाखवलेली जवळीक शिवसेनेसाठी धोक्‍याची आहे. मोदी लाटेतही ‘मनसे’च्या अभिजित पानसे यांनी मिळवलेली ५० हजार मते विसरता येत नाहीत. 

कल्याणमध्ये सामना रंगणार
कल्याणमध्ये शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यात सामना रंगणार आहे. शिवससेनेचे संघटनात्मक कार्य आणि उमेदवार पालकमंत्र्यांचे पुत्र असणे, हे सेनेचे बलस्थान आहे; तर राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांचे आग्री कार्ड चालू शकेल, असा राष्ट्रवादीमधील जाणकारांचा होरा आहे. त्यातच काँग्रेसबरोबरच ‘मनसे’चीही साथ मिळाल्यास कल्याणच्या ‘सुभेदारी’ची निवडणूक चुरशीची होऊ शकते.

रायगडला काट्याची टक्कर
रायगडमध्ये शिवसेनेचे अनंत गिते आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यात काट्याची टक्कर होईल. २०१४ ची निवडणूक तटकरे सुमारे दोन हजार मतांनी हरले होते. या वेळी ‘शेकाप’ची सोबत राष्ट्रवादीचे बलस्थान आहे. मागच्या लोकसभेला ही साथ नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला भाजपची मदत किती मिळते, यावर सारे अवलंबून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com