Loksabha 2019 : लाइव्ह वेबकास्टसाठी यंत्रणा सज्ज

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 एप्रिल 2019

राज्यात सात मतदारसंघांत ११ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, मतदान केंद्रांसाठी नियुक्त केलेले कर्मचारी रवाना झाले आहेत.

मुंबई - राज्यात सात मतदारसंघांत ११ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, मतदान केंद्रांसाठी नियुक्त केलेले कर्मचारी रवाना झाले आहेत.

पहिल्या टप्प्यात एकूण ११६ उमेदवार असून, १४ हजार ९१९ मतदान केंद्र आहेत. तर, १ कोटी ३० लाख ३५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यंदा पहिल्या टप्प्यातील सुमारे १,४०० मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार असून, त्यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचादेखील समावेश आहे. राज्यात सर्वाधिक ३० उमेदवार नागपूर मतदारसंघात असून, सर्वांत कमी ५ उमेदवार गडचिरोली-चिमूर मतदारसंघात आहेत.

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. त्यासाठी ४४ हजार इव्हीएम यंत्र (बॅलेट युनिट आणि सेंट्रल युनिट) आणि २० हजार व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत. सुमारे ७३ हजार ८३७ कर्मचारी मतदानप्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. गडचिरोली- चिमूर, गोंदिया या लोकसभा मतदारसंघांतील दुर्गम भागात असणाऱ्या आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी आणि अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदारसंघांत मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ अशी आहे. यंदा सुमारे १० टक्के मतदान केंद्रांवरील मतदानप्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Live Webcast System Ready