Loksabha 2019 : मनसेच्या भूमिकेचे ‘राज’ गुलदस्तात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने काही ठिकाणच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या असून, युतीची यादीही एक-दोन दिवसांत घोषित होणार आहे. मात्र राज्यातील समीकरणे बदलवण्याची ताकद असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अद्याप गुलदस्तात असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने काही ठिकाणच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या असून, युतीची यादीही एक-दोन दिवसांत घोषित होणार आहे. मात्र राज्यातील समीकरणे बदलवण्याची ताकद असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अद्याप गुलदस्तात असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर काँग्रेस आघाडीसोबत मनसेचा समझोता होईल, अशी चर्चा होती. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल होती; मात्र काँग्रेसने विरोध केला होता. दरम्यान, पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी ९ मार्च रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात नंतर भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. काँग्रेस आघडीत समावेश झाला नाही, तर कल्याण आणि मुंबईतील काही जागा मनसेकडून लढविण्यात येतील, अशी चर्चा होती. कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोट्यातील कल्याणची जागा मनसेला देईल, असेही अनेकांना वाटत होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने ईशान्य मुंबई आणि कल्याण या जागा सोडाव्यात, यासाठी मनसे सुरवातीला आग्रही होती. राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ यांनी राज यांची भेट घेतली होती. यानंतर मनसे राष्ट्रवादीसोबत जाणार का, या चर्चा रंगल्या होत्या. अजित पवार यांनी राज ठाकरे यांना राष्ट्रवादीसोबत घेण्याची सकारात्मक वक्तव्ये केली होती.

राज यांच्या भूमिकेकडे लक्ष
मनसेला हव्या असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. कल्याणमध्ये मनसेकडून राजू पाटील यांचे नाव चर्चेत आहे. मनसेची ताकद असलेल्या ठिकाणी राष्ट्रवादीने उमेदवार उभे केल्याने राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 MNS Raj Thackeray Politics