मुंबई - राज्यात लोकसभेच्या निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला असतानाही प्रचारसभा मात्र घेणार आहे, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार नसल्याने निवडणूक आयोग सभांचा खर्च कसा ग्रहित धरणार असा प्रश्न उपस्थित झाला असता पक्षाच्या खात्यात संबंधित खर्च ग्राह्य धरला जाईल, अशी माहिती आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आचारंसहिता लागू झाली आहे. निवडणुकीच्या प्रचारात होणारा दैनंदिन खर्च दररोज निवडणूक आयोगाला सादर करण्याचे बंधनकारक आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला 70 लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे. तसेच जाहीर सभा किंवा अन्य खर्च पक्षाच्या नावावर दाखवता येतो. राजकीय पक्षांना मात्र कोणतीही खर्चाची मर्यादा नाही. यंदाचा लोकसभा निवडणुका लढविणार नसल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र भाजप सरकारच्या विरोधात सभा घेणार असल्याचा निश्चय त्यांनी केला आहे.
येत्या गुढी पाडव्याला मुंबईत मनसेचा मेळावा होणार आहे. या व्यतिरिक्त राज्याच्या अन्य भागांतही सभा होणार आहेत.
निवडणुकीच्या मैदानात मनसेचे उमेदवार नसताना राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च आयोगाला सादर करावा लागणार आहे. मात्र, संबंधित खर्च कोणत्या खात्यावर दाखवावा असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावर हा खर्च महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या खात्यावर दाखविण्यास मुभा आहे, असे आयोगातील अधिकाऱ्याने सांगितले.
|