Loksabha 2019 : मोदी लाटेचा जोर कायम - रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्‍वास आहे, त्यामुळेच राज्यात युतीचे उमेदवार ४८ पैकी किमान ४५ जागांवर निवडून येतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलाय. ते निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’च्या प्रतिनिधी मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी बोलत होते. दानवे यांच्याशी झालेल्या चर्चेचा हा गोषवारा

भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्‍वास आहे, त्यामुळेच राज्यात युतीचे उमेदवार ४८ पैकी किमान ४५ जागांवर निवडून येतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलाय. ते निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’च्या प्रतिनिधी मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी बोलत होते. दानवे यांच्याशी झालेल्या चर्चेचा हा गोषवारा 

प्रश्‍न - २०१४ मध्ये नरेंद्र मोदी लाट होती, ती आता ओसरलेली दिसते?
दानवे -
 मोदी लाट आज ओसरलेली तर नाहीच, उलट तिचा जोर अधिकच वाढलेला आहे. गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने अत्यंत उत्तम कारभार केला. काँग्रेसच्या ६५ वर्षांच्या सरकारमध्ये केवळ स्वाहाकार सुरू होता.

त्यापेक्षा वेगळा कारभार मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने केला. भाजपचे सरकार सातत्याने लोकाभिमुख निर्णय घेत असते. जनतेचा त्यावर विश्‍वास आहे. मोदीजींच्या काळात भारत महासत्ता होण्याच्या दिशेने झेपावत आहे.

विरोधी पक्ष विरोध करण्यासाठी एकत्र आलेत. पण, त्यांच्यातही एकवाक्‍यता नाही. २०१४ मध्ये आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेतून प्रचार केला; आता आम्ही सत्तेत आहोत. मात्र, मोदी लाट अधिक व्यापक होत आहे, एवढे मात्र सांगतो. आमच्याच जागा जास्त असतील.

प्रश्‍न - आपल्या विश्‍वासाचे कारण समजत नाही; तरीही राज्यात काय स्थिती आहे?
दानवे -
 विश्‍वासाचे कारण म्हणजे आम्ही केलेली विकासकामे. जनधन योजना, उज्ज्वला योजना किंवा बेरोजगारांना स्वयंव्यवसायाला संधी देणारे मुद्रा कर्जाचे धोरण; प्रत्येक वर्गाला मोदी सरकारने काही तरी दिलेले आहे.

महाराष्ट्राचे म्हणाल, तर ‘‘४५ प्लस’ असे चित्र आहे. हिंगोलीत काँग्रेसच्या राष्ट्रीयस्तरावरील नेत्याने लढायचे नाही, असे ठरवले. पर्याय नाही. त्यामुळे तुम्ही नांदेडचे रण सोडू नका, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना काँग्रेस श्रेष्ठींनी सांगितले. सांगली हा तर काँग्रेसचा परंपरागत जिल्हा. तेथेही पक्षाचे चिन्ह घेऊन उमेदवार रिंगणात नाही. उमेदवारी कोणी घ्यायची, यावर निर्णय होत नव्हता. बालेकिल्ल्यांची ही स्थिती, तर अन्य जागांचे काय असणार? सातारा, कोल्हापूर येथे गेलो होते, तेथे मोदी आणि फडणवीस सरकार यांची कामे पोचली आहेत. चित्र बदलले आहे. बारामतीत मागच्या वेळी भाजपचे चिन्ह घेऊन उमेदवार रिंगणात नव्हता. त्यामुळे सुप्रियाताई निवडून आल्या, या वेळी असे घडणार नाही. ती जागाही आम्ही जिंकू. 

प्रश्‍न - शिवसेनेशी जमवून घेण्याची गरज का वाटली? 
दानवे -
 दोन्हीही पक्ष वेगळे आहोत. पण, आमची विचारधारा एक आहे. निवडणुकीच्या तोंडावर परस्परांशी संबंध नसलेले ५६ पक्ष एकत्र आले केवळ विरोधासाठी. परस्पर संबंध नसलेली मंडळी आघाडी करतात; आम्ही तर एकाच विचारधारेचे पाईक आहोत. हिंदुत्वाच्या विचारासाठी आम्ही एक आलो, एका विधानसभेच्या निवडणुकीवेळी युती झाली नाही, याचे आम्हा दोघांनाही शल्य आहे. एकत्र काम करण्याची आम्हाला सवय आहे. त्यामुळे आमचे एकत्र येणे नैसर्गिक आहे.

प्रश्‍न - राफेल करार हा भ्रष्टाचारमुक्‍त भारताचा दावा खोडून टाकणारा करार आहे. चौकीदाराच्या प्रामाणिकतेबद्दल प्रश्‍न निर्माण करणारा आहे, अशी टीका होते.
दानवे -
 काँग्रेसने केलेल्या करारापेक्षा राफेलचा करार आम्ही २० टक्‍के कमी किमतीने केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या व्यवहारात अनियमितता असल्याचे कुठेही नमूद केलेले नाही. या विषयावर चर्चेची भाजपची तयारी आहे. मात्र, संरक्षण व्यवहाराबाबत सतत तक्रारी केल्या, तर देशाचेच नुकसान होते, हे लक्षात घ्यायला नको काय? 

प्रश्‍न - उमेदवारी देताना काही जणांना डावलले गेले?
दानवे - त्यांना अन्य जबाबदाऱ्या देणार आहोत.

(उद्याच्या अंकात - जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष)

Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi raosaheb danve Politics