Loksabha 2019 : गर्दी आणि सोशल मीडियावर ‘युद्ध’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. राज्यातील प्रचारासाठीच्या मोदींच्या या पहिल्याच सभेने भाजप आणि काँग्रेसमध्ये चर्चा आणि वादाचा धुरळा उडवून दिला.

वर्धा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. राज्यातील प्रचारासाठीच्या मोदींच्या या पहिल्याच सभेने भाजप आणि काँग्रेसमध्ये चर्चा आणि वादाचा धुरळा उडवून दिला. मोदींची ही सभा, सभेला झालेली गर्दी आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे दावे यामुळे हा विषय दिवसभर चर्चेत होता. 

पंतप्रधान मोदींच्या वर्ध्यातील सभेनंतर आज दिवसभर ट्विटरवर #Wardha आणि #ModiInWardha हे दोन हॅशटॅग ट्रेंडिंग होते. या दोन हॅशटॅगअंतर्गत मोदी समर्थकांनी मोदींच्या भाषणात केलेली वक्तव्ये ट्विट केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस पक्ष यांना मोदींनी लक्ष्य केले. त्यांनी केलेल्या आरोपांपैकी, ‘सध्याचे वारे भाजपच्या बाजूने असल्याने शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली’, ‘शरद पवार हे पुतण्याच्या हातून हिटविकेट झाले’ आणि ‘हिंदू दहशतवाद हा शब्द काँग्रेसने पेरला’ ही तीन विधाने ट्‌विटरवर सर्वाधिक वेळा शेअर झाली. 

दुपारच्या रणरणत्या उन्हात आयोजित केलेल्या या सभेला जमा झालेल्या गर्दीचा विषय सर्वाधिक चर्चिला गेला. या सभेला अपेक्षेपेक्षा गर्दी खूप कमी होती, मैदान अर्धेच भरले होते, असा दावा करणारी छायाचित्रे आणि व्हिडिओ ट्‌विटरकरांनी व्हायरल केले. काही जणांनी फोटो एडिटिंग करून गर्दी वाढवून दाखविलेले फोटोही शेअर केले. फेसबुकवर मात्र गर्दीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओवर ‘मोदींच्या जुमलेबाजीला जनता बळी पडणार नाही’, ‘आता विकास झाला नाही तर जनता चौकीदाराला खरेच पाठवेल’ अशा कमेंट्‌स केल्या. या गर्दीवरून विरोधकांनी मोदींचा प्रभाव ओसरल्याची टीका केली, तर भाजपने ‘तुम्ही अशी गर्दी जमवून दाखवा’ असे आवाहन केले. ४२ अंशांच्या उन्हातही जनतेने गर्दी केली, त्यामुळे या वेळीही मोदीच जिंकून येतील, असा विश्‍वास व्यक्त करणाऱ्या कमेंट्‌स मोदी समर्थकांनी केल्या.

पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा हे त्यांच्याच पक्षाचे प्रतिबिंब होते; अगदी थोडक्‍यात सांगायचे तर अपयशी, अपयशी आणि अपयशी !
- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा येथील सभेला लोकांची गर्दी नव्हती, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला. मात्र या सभेला सुमारे एक लाख लोकांची गर्दी होती. ४२ अंश सेल्सिअस तापमानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा घेऊन या सभेला निदान ५ हजार लोकांची गर्दी करून दाखवावी. 
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री 

Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi Speech Social Media Politics