Loksabha 2019 : नव्या चेहऱ्यांना नेतृत्वाची संधी..!

संजय मिस्कीन
मंगळवार, 19 मार्च 2019

मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना सर्वच पक्षांत नव्या युवा चेहऱ्यांना भावी नेतृत्वाची चुणूक दाखवण्याची मोठी संधी चालून आलेली आहे. या निवडणुकीत युवक मतदार जसा निर्णायक आहे, अगदी त्याच धर्तीवर युवा नेतृत्वदेखील भविष्यातील राजकारणाची ‘वीट’ रचण्याच्या तयारीला जोमाने लागले आहेत. यामध्ये नेत्याच्या घरातील युवा पिढी महत्त्वाच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना सर्वच पक्षांत नव्या युवा चेहऱ्यांना भावी नेतृत्वाची चुणूक दाखवण्याची मोठी संधी चालून आलेली आहे. या निवडणुकीत युवक मतदार जसा निर्णायक आहे, अगदी त्याच धर्तीवर युवा नेतृत्वदेखील भविष्यातील राजकारणाची ‘वीट’ रचण्याच्या तयारीला जोमाने लागले आहेत. यामध्ये नेत्याच्या घरातील युवा पिढी महत्त्वाच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.

राज्याच्या राजकारणात शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीन गडकरी, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, सुनील तटकरे हे नेते अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणातले केंद्रबिंदू आहेत. राज्याचे सर्वच राजकारण या नेत्यांच्या अवतीभोवतीच फिरत असते. या वेळीही हे नेते प्रमुख भूमिकेतच असले तरी, त्यांच्या पाठोपाठ नवे युवा चेहरेदेखील राजकीय रणांगणात झेपावले आहेत. यामध्ये आदित्य ठाकरे, अमोल कोल्हे, सुजय विखे, रोहित पवार, धीरज देशमुख, अदिती तटकरे, पार्थ पवार, सुजात आंबेडकर, सत्यजित तांबे, सचिन खरात यांसारखे नवे युवा चेहरे या निवडणुकीतले प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.

सुजय विखे, अमोल कोल्हे व पार्थ पवार हे प्रत्यक्षात लोकसभेसाठीचे उमेदवारच असल्याने त्यांना ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. यामध्ये जो बाजी मारेल तो तरुण वयातच केंद्राच्या राजकारणात पाय ठेवणार आहे. शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार, विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख, प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर, बाळासाहेब थोरात यांचे भाचे व युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे आणि दलित चळवळीतला तरुण चेहरा सचिन खरात या युवा नेत्यांना निवडणुकीत आपापल्या पक्षासाठी प्रभावी कामगिरी करून दाखवण्याची संधी आहे.  

आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. प्रचाराच्या सभांसाठी ते पहिल्यांदा मुंबईव्यतिरिक्‍त महाराष्ट्रभर फिरणार आहेत. रोहित पवार यांच्याकडे नगर दक्षिण या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. विलासराव देशमुख यांच्यानंतरची निर्माण झालेली पोकळी धीरज देशमुख यांना लातूरमध्ये भरून काढण्याचे आव्हान आहे. वंचित बहुजन आघाडी सर्व जागा लढवत असताना प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर जाहीर सभांच्या व्यासपीठांवर हजेरी लावत आहेत. अनेक आंदोलने आणि दलित संघटक म्हणून सचिन खरात यांनाही काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावरून नेतृत्व ठसवण्याची संधी आहे.

रणनीतीकार, प्रचारक व संघटकही
प्रत्यक्ष उमेदवार नसलेले हे युवा नेते या निवडणुकीत रणनीतिकार, प्रचारक व संघटक म्हणून सामान्य जनतेच्या समोर प्रथमच जाणार आहेत. या सर्व नव्या व युवा चेहऱ्यांना राजकीय नेतृत्वाची चुणूक दाखवणारी मोठी संधी म्हणून या लोकसभा निवडणुकीकडे पाहिले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 New Candidate Politics