Loksabha 2019 : मुस्लिम, दलित मते निर्णायक!

सिद्धेश्‍वर डुकरे
गुरुवार, 25 एप्रिल 2019

प्रचारातील मुद्दे
काँग्रेस -
 नोटाबंदी, बेरोजगारी, राफेल, पुलवामा हल्ला, स्मार्ट सिटी, मोदी सरकारच्या फसलेल्या योजना
भाजप - राष्ट्रवाद, बालाकोट हल्ला, सरकारच्या योजनांचा प्रचार

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन, काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि वंचित आघाडीचे ए. आर. अंजारिया यांच्यात सामना रंगला आहे. सुमारे १६ लाख मतदारांपैकी जवळपास ३० टक्के मुस्लिम आणि दलित मते असल्याने ती निर्णायक ठरणार आहेत.

पूनम महाजन आणि प्रिया दत्त यांच्यातील समान वैशिष्ट्य म्हणजे दोघींनाही राजकीय पार्श्‍वभूमी आहे. पूनम यांचे वडील प्रमोद महाजन भाजपचे केंद्रात मंत्री होते, तर प्रिया यांचे वडील सुनील दत्त काँग्रेसचे खासदार, अभिनेते होते.

मतदारसंघात उच्चभ्रू सोसायटी, झोपडपट्ट्या आणि चाळीही आहेत. विविध धर्मीय, बहुभाषक मतदारांचा भरणा आहे. मतदारसंघात शिवसेनेचे तीन, भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते. चौरंगी लढतीत भाजपची लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मते कमी झाली होती. आता मोदी लाट नसल्याने मतदान किती होते, यावरही विजयाचे समीकरण ठरणार आहे. तसेच, या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि ‘एमआयएम’चे उमेदवार नसले, तरी मनसेची मतेही निर्णायक ठरणार आहेत. चार वर्षे भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेनेचे कार्यकर्ते युतीनंतर एकदिलाने काम करणार का? हेही पाहणे महत्त्वाचे आहे. पूनम महाजन यांच्यासाठी विजय सहज सोपा नसला, तरी विस्कळित झालेल्या काँग्रेसची घडी बसविण्याचे आव्हान प्रिया दत्त यांच्यासमोरही आहे. मोदी लाटेत झालेल्या पराभवाचा शिक्‍का पुसण्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

मतदारसंघातील समस्या
    कुर्ल्यातील झोपडपट्ट्या, वांद्रे रेल्वे स्थानकाच्या आवारातील बहुमजली झोपडपट्ट्या आणि त्यास वारंवार लागणाऱ्या आगी 
    रेल्वेच्या हद्दीतील जमिनीवर अतिक्रमण
    वांद्रे येथे मलनिस्सारण केंद्राची समस्या
    विमानतळाच्या शेजारील झोपड्यांचा प्रश्‍न


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 North Central Mumbai Constituency Muslim Voting