Loksabha 2019 : मराठी-बिगरमराठी मतविभाजनाचे पडघम

संजय मिस्कीन
Thursday, 25 April 2019

मतदारसंघातील प्रश्‍न

  • १६०० हेक्‍टरहून अधिक क्षेत्रातील मिठागरांचा प्रश्‍न
  • वाहतूक कोंडीतून सुटकेसाठी नाहूर ते मुलुंड अंतर्गत रस्त्यांची गरज 
  • रमाबाई आंबेडकरनगर आणि मानखुर्द शिवाजीनगर झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास 
  • मानखुर्दमधील कब्रस्तानचा रखडलेला प्रश्‍न

मुंबई उत्तर-पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मराठी, बिगरमराठी, मुस्लिम आणि दलितबहुल लोकवस्तीचा. देशात असणाऱ्या लाटेनुसार या मतदारसंघातून निकालाचा कौल मिळत असतो; मात्र सध्या येथे मराठी-बिगरमराठी मतविभाजनाचे पडघम वाजत आहेत. 

शिवसेनेच्या कठोर विरोधाने या मतदारसंघात भाजप-शिवसेना संघर्ष टोकाला गेला. विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारण्याची वेळ भाजपवर आल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संजय दिना पाटील यांची बाजू सावरल्याचे चित्र आहे. अशातच ‘मनसे’चे इथे सुमारे दोन लाख मतदार असल्याने आघाडीला त्याचा फायदा होणार, यात शंका नाही. भाजपचे मनोज कोटक आणि पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे.

कोटक अगदी नवखे उमेदवार आहेत. भाजपचा पारंपरिक मतदार ही त्यांची जमेची बाजू. पाटील यांचा चेहरा मतदारसंघात परिचित आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असताना आघाडीची बाजू वरचढ असल्याचे चित्र आहे. याउलट शिवसेना-भाजप युतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अद्याप समन्वयाचा अभाव दिसतो. २००९ मध्ये सोमय्या नवखे उमेदवार होते. त्या वेळी मराठी-बिगरमराठी फॅक्‍टरमुळे पाटील विजयी झाले. हेच चित्र यंदा आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेत सोमय्या साडेतीन लाखांच्या मताधिक्‍याने जिंकले; पण या वेळी त्यांना शिवसेनाविरोध भोवला. कोटक यांच्यासोबत ते प्रचारात सहभागी होत असल्याने शिवसेना कार्यकर्त्यांत बेचैनी आहे. शिवसेना-भाजप युतीच्या या अंतर्गत धुसफुशीचा पाटील यांना लाभ होईल, अशी चर्चा आहे. 

दलित, मुस्लिम, ख्रिस्ती बहुतांशी मतदार आघाडीसोबत राहतील, असे मानले जाते. मराठी मतदार शिवसेनेसोबत असले, तरी पाटील यांचा स्थानिक संपर्क दांडगा असल्याने मराठी मतांवरही त्यांचा प्रभाव आहे.

शिवसेनेचे दोन आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे. मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचाच बोलबाला दिसत असला, तरी लोकसभा निवडणुकीत मात्र सतत वेगळे चित्र या मतदारसंघात दिसते. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीच्या वादात आघाडीच्या संजय दिना पाटील यांना संधी असल्याची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Northeast Mumbai Constituency Marathi Voting Politics