Loksabha 2019 : तोफखाना सज्ज; बंदुकाही रोखल्या

श्रीमंत माने
रविवार, 24 मार्च 2019

मोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या, प्रमुख राजकीय घराण्यांच्या नव्या पिढीत उफाळून आलेल्या महत्त्वाकांक्षा आणि त्यातून आकाराला आलेले डावपेच या पार्श्‍वभूमीवर सगळ्यांच पक्षांनी उमेदवारांच्या याद्या अतिशय सावधपणे जाहीर केल्या आहेत. रविवारपासून प्रत्यक्ष प्रचारात धडाडणाऱ्या तोफा, प्रतिस्पर्ध्यांवर चालवायच्या बंदुका अन्‌ स्पर्धकांच्या गोटात फोडायचे फटाके या साऱ्यांचेच पत्ते भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांनी हातातच राखून ठेवलेत. 

मोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या, प्रमुख राजकीय घराण्यांच्या नव्या पिढीत उफाळून आलेल्या महत्त्वाकांक्षा आणि त्यातून आकाराला आलेले डावपेच या पार्श्‍वभूमीवर सगळ्यांच पक्षांनी उमेदवारांच्या याद्या अतिशय सावधपणे जाहीर केल्या आहेत. रविवारपासून प्रत्यक्ष प्रचारात धडाडणाऱ्या तोफा, प्रतिस्पर्ध्यांवर चालवायच्या बंदुका अन्‌ स्पर्धकांच्या गोटात फोडायचे फटाके या साऱ्यांचेच पत्ते भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांनी हातातच राखून ठेवलेत. 

देशाच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीची रणदुदुंभी वाजल्यानंतर खासदारांच्या संख्येबाबत दुसऱ्या क्रमांकाचे महाराष्ट्र राज्य येत्या मे महिन्यात नव्या सरकारच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणार हे निश्‍चित. पण, दोलायमान राजकीय स्थिती आणि स्पष्ट कल न दाखवणारे मतदारांचे मन पाहता उमेदवार निवडीवेळी प्रमुख राजकीय पक्षांनी कोणताही धोका पत्करलेला नाही. एकमेकांना शह-काटशहदेखील सावधगिरी बाळगूनच दिलेत. नेत्यांची फोडाफोडीदेखील राजकीय समीकरणे लक्षात घेऊनच केली. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांमधील, अर्थात प्रदेशनिहाय विचार करता विदर्भ दहा, मराठवाडा आठ, नाशिक-नगरसह उत्तर महाराष्ट्र आठ, 

 मुंबई सहा आणि ठाण्यासह कोकण सहा अशा मिळून किनारपट्टीच्या बारा आणि पश्‍चिम व दक्षिण महाराष्ट्र दहा अशा मतदारसंघांचे चित्र अखंड सावध पवित्रा असेच आहे. 

भाजपकडून मातृशक्‍तीला पसंती
भाजपने युतीत वाट्याला आलेल्या पंचवीस जागांपैकी सात ठिकाणी महिला उमेदवार देऊन नारीशक्‍तीचा आगळा प्रयोग केलाय. त्याचा खरा आविष्कार उत्तर महाराष्ट्रात दिसतोय. खानदेश, नाशिक आणि नगर मिळून या भागातील सर्व आठ जागा सध्या भाजप-शिवसेना युतीकडे आहेत. त्यापैकी सहा खासदार असणाऱ्या भाजपने जळगाव, दिंडोरी आणि नगर अशा तीन जागी विद्यमान खासदारांऐवजी नवे चेहरे देण्याचा प्रयोग केलाय. आणखी वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग म्हणजे या सहापैकी चार ठिकाणी भाजपने महिलांना संधी दिली. विद्यमान खासदार रक्षा खडसे (रावेर) आणि डॉ. हीना गावित (नंदुरबार) यांच्या जोडीने जळगावात विधान परिषद सदस्य स्मिता वाघ आणि दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आलेल्या डॉ. भारती पवार रिंगणात आहेत. नगरमध्ये विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या जागी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय बहुचर्चित पक्षांतर करून भाजपकडून रिंगणात आहेत. 

शिवसेनेची सावध खेळी
चार प्रमुख पक्षांपैकी सर्वाधिक सावध खेळी शिवसेना खेळली आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी युतीचा घटक असूनही पाच वर्षे सरकारचा सर्वाधिक कडवा टीकाकार बनलेल्या शिवसेनेने अचानक यू टर्न घेऊन लोकसभेसाठी भाजपशी हातमिळवणी केल्याने शिवसैनिकांची जी अडचण झाली ती ओळखून जुन्याच मावळ्यांना रिंगणात उतरविण्यासाठी पक्ष कदाचित अगतिक असावा. पालघर आणि सातारा वगळता एकवीस जागांवर उमेदवार जाहीर करताना उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर व हिंगोलीत हेमंत पाटील असे दोनच नवे चेहरे शिवसेनेच्या यादीत आहेत. 

उसनवारीवर काँग्रेसचा भरवसा नाय
दोन्ही काँग्रेसनी प्रत्येकी २४ जागा वाटून घेतल्यात. आपल्या वाट्याच्या जागांमधूनच त्यांनी मित्रपक्षाला सामावून घ्यायचे आहे. पालघरची जागा काँग्रेस बहुजन विकास आघाडीला सोडण्याची शक्‍यता आहे. गटबाजीमुळे त्रस्त काँग्रेसला मोठा धक्‍का बसला तो विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलानेच पक्ष सोडल्याचा. त्याशिवाय जागोजागी अंतर्गत धुसफूस आहे. त्यामुळेच शक्‍यतो निष्ठावंतांनाच उमेदवारी देण्याचा उपाय पक्षाने शोधलाय. उसनवारीच्या उमेदवारीवर काँग्रेसचा भरवसा नाय, हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादीकडून तरुण चेहरे
पहिल्या किंवा दुसऱ्या वेळेस मतदान करणाऱ्या युवक मतदारांची मोठी संख्या लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक तरुण चेहऱ्यांना लोकसभेसाठी रिंगणात उतरविले आहे. माढ्यात रणजितसिंह मोहिते पाटील, दिंडोरीत डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपचा झेंडा हातात घेतल्यानंतर अनुक्रमे संजयमामा शिंदे आणि धनराज महाले यांना भाजप-शिवसेनेच्या गोटातून खेचून आणण्यात राष्ट्रवादीला यश आले. पश्‍चिम, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यावर राष्ट्रवादीची अधिक भिस्त आहे. राज ठाकरे यांची सोबतही कामी येईल. 

मनसे ‘नॉन-प्लेइंग कॅप्टन’?
गेल्या निवडणुकीवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यातील सर्वांत मोठे प्रशंसक होते. अगदी भाजपचे प्रमुख नेतेही मोदींचे जे कर्तृत्त्व सांगत नव्हते, ते ठाकरे सांगायचे. ‘मनसे’च्या नाशिकमधील उमेदवारांच्या प्रचारपत्रांवर मोदींचे छायाचित्र असल्याबद्दल भाजपकडून आक्षेप घेण्यात आला होता. पाच वर्षांत पुलाखालून इतके पाणी गेले की दोन्ही काँग्रेसचा एकही नेता मोदींवर टीका करण्याबाबत राज यांचा हात धरू शकत नाही. पंतप्रधानांवरील त्यांची घणाघाती टीका पाहता दोन्ही काँग्रेसनी त्यांना स्टार प्रचारक म्हणून राज्यभर फिरवावे, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवार नसतील. या पार्श्‍वभूमीवर, राज ठाकरे यांची भूमिका टेनिसमधील नॉन-प्लेइंग कॅप्टनसारखी असेल. 

राज्यातील लढतींची वैशिष्ट्ये
- भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी अशी सरळ लढत
- सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून काही ठिकाणी आव्हान उभे करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा प्रयत्न
- शहरी व ग्रामीण असे राज्यातील मतदारांच्या मानसिकतेचे विभाजन
- शहरी भागात बेरोजगारीचा मुख्य निवडणूक मुद्दा, पण नरेंद्र मोदी यांची हवा टिकून
- नोटाबंदीचे दुष्परिणाम व जीएसटीमधील अडथळ्यांची चर्चा तुलनेने कमी
- पुलवामा दहशतवादी हल्ला व भारताच्या हवाई कारवाईनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अनुकूलता
- केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या युतीचा ग्रामीण भागात खरा कस
- शेतीचे प्रश्‍न, शेतमालाचे कोसळलेले भाव, शेतकरी आत्महत्या या मुद्यांवर रालोआ अडचणीत
- धार्मिक व जातीय द्वेष, विषारी वातावरणाचा परिणाम अंतिमत: निकालावर शक्‍य

वंचितांची आघाडी घुसणार की फसणार?
सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबविताना थेट उमेदवारांच्या नावापुढे जात लिहिण्याचा प्रयोग ॲड. प्रकाश आंबेडकर व खा. असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने केला खरा. परंतु, खऱ्या लढाईला सुरवात होण्याच्या टप्प्यावर आघाडीचा प्रत्यक्ष मैदानात प्रभाव जाणवत नाही. समाजातील वंचितांच्या ज्या वर्गात सत्ताकांक्षा रूजवायची, त्यांच्यापर्यंत आघाडीचे उद्देश पोचविण्यात आंबेडकर किती यशस्वी होतात, यावर सारे काही अवलंबून असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Politics BJP Shivsena NCP Congress