Loksabha 2019 : कारभारी निवडा... पण जरा विचारपूर्वक!

संभाजी पाटील
रविवार, 21 एप्रिल 2019

देश एका स्थित्यंतरातून जात असल्याने यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. अशावेळी ‘निवडणूक काय नेहमीचीच तर आहे’, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशातील राजकीय स्थितीचा अचूक अंदाज घेऊन पुणेकर आपला ‘कल’ नोंदवितात. त्यामुळे पुणेकरांचा कल कोठे आहे, याबाबत राजकीय नेत्यांनाही उत्सुकता असते.

देश एका स्थित्यंतरातून जात असल्याने यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. अशावेळी ‘निवडणूक काय नेहमीचीच तर आहे’, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशातील राजकीय स्थितीचा अचूक अंदाज घेऊन पुणेकर आपला ‘कल’ नोंदवितात. त्यामुळे पुणेकरांचा कल कोठे आहे, याबाबत राजकीय नेत्यांनाही उत्सुकता असते. लोकसभा निवडणूक ही जबाबदारीचे भान ठेवून पार पाडण्याची प्रक्रिया असल्याने, यंदा जास्तीत जास्त मतदान करून आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी पुणेकर आघाडीवर असतील, यात शंका नाही.

निवडणुकीचा प्रचार रविवारी सायंकाळी थांबेल. तोपर्यंत राजकीय पक्ष आपापल्या भूमिका मांडतील. शक्तिप्रदर्शन करतील. दुसऱ्या उमेदवारापेक्षा आपणच कसे उजवे आहोत हे सांगतील. पक्षाची ध्येयधोरणे, पुढील पाच वर्षांत काय करणार याची जंत्री मांडतील. पण त्यानंतर खरी जबाबदारी सुरू होईल ती आपली. मतदार म्हणून लोकशाही बळकट करणाऱ्या, तिला शाबूत ठेवणाऱ्या, या व्यवस्थेत होणारे बिघाड ताळ्यावर आणणाऱ्या नागरिकांची. 

गेल्या वीस-बावीस दिवसांपासून सुरू असलेला प्रचार, राजकीय सभा, रॅली, जाहीरनामे, वर्तमानपत्र, सोशल मीडिया, टीव्ही चॅनेल आदींच्या माध्यमातून मतदारांनी आपले मत बनवलेही असेल. काही जण अजूनही विचार करत असतील, तर अनेकांच्या डोक्‍यात ‘कोणी आलं तरी आपल्याला काय फरक पडणार?’ असाही विचार सुरू असेल. 

प्रत्येकाचा मतदान करण्यामागचा विचार आणि फंडा ठरलेला असतो. तो असलाच पाहिजे. पण या राजकीय समीकरणाच्या गोंधळात ही निवडणूक ‘देश कोणाच्या हातात द्यायचा’ यासाठी होणार आहे, हे लक्षात ठेवावेच लागेल. एकूणच देशपातळीचा विचार करून, गेल्या पाच वर्षांतील अनुभव लक्षात घेऊन, त्या अगोदरच्या सरकारांशी तुलना करून आपण मतदान यंत्रातून स्वतःला व्यक्त करायला हवे. बऱ्याचदा निवडणूक कोणतीही असली, तरी आपण ‘घरासमोरचा रस्ता कसा आहे’, ‘नळाला पुरेशा दाबाने पाणी येते का’, ‘मुला-मुलीचे शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधीने मदत केली का?’ अशा स्थानिक विषयांशी तुलना करतो. अर्थात, ही तुलना गैरही नाही. पण खासदाराची नेमकी काय कामे आहेत, त्याच्याकडून काय अपेक्षित आहे, हेही समजून घ्यायला हवे. सर्वांत महत्त्वाचे मतदान करणे आवश्‍यक आहे.

गेल्या निवडणुकीत पुण्यात ५४ टक्के मतदान झाले होते. ही टक्केवारी तुलनेने फारच कमी आहे. शहरी भागात विशेषतः उच्च मध्यमवर्गीय, उच्चभ्रू व्यक्ती मतदानास बाहेर पडत नाहीत हा अनुभव आहे. जर व्यवस्थेबद्दल आपण दररोज पोटतिडकीने बोलत असू, फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांतून आपल्याला खटकणाऱ्या बाबींवर टीका करीत असू आणि त्या सुधारण्याची अपेक्षा लोकप्रतिनिधींकडून करीत असू, तर मतदान करून एक जबाबदार नागरिक म्हणून व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार तरी प्राप्त करूयात. 

यंदा पुणेकर जास्तीत जास्त संख्येने मतदानासाठी बाहेर पडतील अशी आशा आहे. पुण्याची वाटचाल केव्हाच महानगराकडे झाली आहे. शहरात वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर आहे. नोकरी-धंदा-शिक्षणाच्या निमित्ताने शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विस्ताराचा वेगही जास्त आहे. अशावेळी शहराला आकार देणारे नेतृत्व हवे आहे.

महापालिका, राज्य सरकार आणि केंद्रात समन्वय साधून शहराला ‘व्हिजन’ देणाऱ्या नेत्याची आज गरज आहे. दिल्लीत पुण्याचा आवाज खणखणीतपणे उमटायला हवा. ही गरज पूर्ण करणारा लोकप्रतिनिधी आपल्याला निवडावा लागणार आहे. यात नवमतदारांची जबाबदारी मोठी आहे, कोणत्यातरी लाटेवर स्वार होऊन निर्णय घेण्याऐवजी युवा मतदार विचार करून निर्णय घेतील, याबाबत खात्री आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Politics Political Party