Loksabha 2019 : पंतप्रधानांच्या दौऱ्यांच्या खर्चाचा तपशीलच नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

मोदींचे असेही दौरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल, त्रिपुरा, मणिपूर, छत्तीसगढ़, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगण, आसाम, जम्मू- काश्‍मीर, अरुणाचल प्रदेश या राज्यांचा दौरा केला होता. मोदी हे दिनांक २८ मार्च २०१९ पासून ९ एप्रिल २०१९ दरम्यान २५ ठिकाणी गेले होते.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशांतर्गत प्रवास दौऱ्यांची माहिती आमच्या अभिलेखाचा भाग नाही, त्यामुळे या दौऱ्यांवर झालेल्या खर्चाची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे याबाबत विचारणा केली होती.

गलगली यांनी २६ मे २०१४ पासून आतापर्यंत पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यांवर झालेल्या खर्चाचा तपशील मागितला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशांतर्गत केलेल्या दौऱ्यांवर झालेल्या खर्चाची माहिती या कार्यालयाच्या अभिलेखाचा भाग नसल्याचे सांगत खर्चाची माहिती कोणत्याही एका सार्वजनिक प्राधिकरणाकडे नसल्याचा खुलासा पंतप्रधान कार्यालयाने केला आहे. तसेच, पंतप्रधानांच्या दौऱ्यांच्या आयोजनात अनेक सार्वजनिक प्राधिकरण सहभागी असतात, त्यामुळे त्यांचे निवडणुकीशी संबंधित दौरे, बिगर शासकीय असल्यामुळे ती माहिती अभिलेखाचा भाग नसल्याचे स्पष्ट केले. मोदी यांचे परदेश दौरे आणि चार्टर्ड फ्लाइट्‌सवर झालेल्या खर्चाची माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनिल गलगली यांनी संकेतस्थळाचे निरीक्षण केले असता त्यांच्या लक्षात आले, की संकेतस्थळावर पंतप्रधानांनी बिगर शासकीय दौरा केला, त्याचा फक्त उल्लेख आहे; परंतु खर्चाची आकडेवारीच नाही.

Web Title: Loksabha Election 2019 Prime Minister Tour Expenditure