Loksabha 2019 : राज ठाकरे यांचा बारामतीसाठी ‘मास्टर स्ट्रोक’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

पुणे - मनसेचे प्रभाव क्षेत्र असणाऱ्या पुण्यात सिंहगड रस्त्यावर सभा घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाचवेळी पुणे आणि बारामती अशा दोन्ही मतदारसंघात भाजपला लक्ष्य करणार आहेत. त्यामुळे या सभेबाबत उत्सुकता वाढली आहे.

पुणे - मनसेचे प्रभाव क्षेत्र असणाऱ्या पुण्यात सिंहगड रस्त्यावर सभा घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाचवेळी पुणे आणि बारामती अशा दोन्ही मतदारसंघात भाजपला लक्ष्य करणार आहेत. त्यामुळे या सभेबाबत उत्सुकता वाढली आहे.

मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्यास जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर राज यांच्या राज्यभर सहा सभा होत आहेत. पहिल्या सभेत राज यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुद्देसूद टार्गेट केले. त्यामुळे त्यांच्या सभेचे राजकीय वर्तुळात कौतुकही झाले. त्यामुळे राज यांच्या सभा राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी व्हाव्यात, अशी इच्छा काँग्रेस आघाडीने व्यक्त केली. पुण्यात त्यांची गुरुवारी (ता. १८) सिंहगड रस्त्यावरील गोयलगंगा प्रकल्पाशेजारी डी. 
पी. रस्ता येथील शिंदे मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता सभा होत आहे.

ही सभा बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी होत असली तरी, एकाच सभेत पुणे, बारामती आणि मावळ, अशा तीनही मतदारसंघाचा प्रचार होईल, अशी व्यूहरचना आखण्यात आली आहे. 

पुण्यात मनसेची स्वतःची अशी ‘व्होट बॅंक’ आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांना ९३ हजार मते मिळाली होती. त्यानंतर विधानसभा आणि पुणे महापालिका निवडणुकीतही मनसेला फारसा प्रभाव दाखवता आला नाही. मात्र, राज यांच्या सभेला गर्दी करणारा मोठा वर्ग पुण्यात आहे. त्याचा फायदा अर्थातच या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला होणार आहे. 

राज यांच्या सभेचे ठिकाण हे खडकवासला मतदारसंघात असले तरी कोथरूड, पुण्यातील पेठांचा भाग यासाठी हे ठिकाण फारसे लांब नाही. या वेळी त्यांच्या सभेस केवळ मनसेच्या कार्यकर्त्यांची गर्दी असणार नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे कार्यकर्तेही सभेला आवर्जून हजेरी लावणार आहेत. त्यादृष्टीने आघाडीची तयारीही सुरू झाली आहे.

खडकवासला मतदारसंघात मनसेचा पहिला आमदार विजयी झाला होता. ठाकरे यांना मानणारा वर्ग या परिसरात आहे. त्यामुळे सभेला चांगली गर्दी होईल, असा दावा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. गेल्या लोकसभा निवडणुकीतही राज यांचीच सर्वांत मोठी सभा डेक्कन परिसरात नदी पात्रात झाली होती. बारामती मतदारसंघातील खडकवासला मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहेत.

महापालिका निवडणुकीतही परिसरात भाजपला चांगले यश मिळाले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत रासपचे महादेव जानकर यांना २८ हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. या वेळीही भाजपने खडकवासला मतदारसंघात पूर्ण ताकद लावली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मिळणारे मताधिक्‍य खडकवासला मतदारसंघात भरून काढायचे, अशी व्यूहरचना भाजपने आखली आहे. याच कारणासाठी राष्ट्रवादीकडून ‘मास्टर स्ट्रोक’ म्हणून राज यांच्या सभेकडे पाहिले जात आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Raj Thackeray Baramati Politics BJP