Loksabha 2019 : राज ठाकरे म्हणजे बारामतीचा पोपट

Raj-and-Devendra
Raj-and-Devendra

मुंबई - राज ठाकरे म्हणजे बारामतीचा पोपटच असून, त्यांच्या भाषणांच्या स्क्रिप्ट या बारामतीहूनच येतात, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज केला. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात मुंबई विभागीय भाजपच्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.

या मेळाव्याला केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, भाजपचे मुंबई विभागीय अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपचे अन्य नेते उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर खास शैलीत शनिवारी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बारामतीला पोपटांची कमी पडली, की ते नव्या पोपटाच्या शोधात असतात. सूर्याकडे पाहून थुंकले, की थुंकी आपल्याच तोंडावर पडते आणि मोदी हे सूर्यासारखे आहेत. राज ठाकरे हे कलाकार आहेत. त्यामुळे त्यांचे काम हे दिलेली स्क्रिप्ट वाचणे एवढेच आहे.

बारामतीचे पोपट संपले, की हे बोलायला लागतात. ज्यांना एकही नगरसेवक आणि आमदार निवडून आणता आला नाही, त्यांचे कोण ऐकणार? त्यांच्या पक्षात एकही नॉनप्लेइंग किंवा १२वा गडी नाही. त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

लोकसभेच्या ४५ जागा जिंकणार
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी ४५ जागा शिवसेना-भाजप युती जिंकणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. याआधी पुण्यात झालेल्या पदाधिकारी मेळाव्यातही मुख्यमंत्र्यांनी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्‍त केला होता. पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफ हल्ल्याला नरेंद्र मोदी यांनी चोख प्रत्युत्तर देत बालाकोट येथे एअर स्ट्राइक केला. यावरून योग्य व्यक्‍तीच्या हातात देश सुरक्षित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

तिसरा सर्जिकल स्ट्राइक मतदार करतील - स्वराज
दहशतवाद्यांच्या विरोधात केंद्र सरकारने दोन सर्जिकल स्ट्राइक केले असून, आता तिसरा सर्जिकल स्ट्राइक मतदार करतील, असा इशारा लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत सुषमा स्वराज यांनी विरोधकांना दिला. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हे माझे शेवटचे भाषण असेल, असे सांगून केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांचा ऊहापोह स्वराज यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com