Loksabha 2019 : विजयोत्सवाची तयारी सुरू

मंगळवार, 21 मे 2019

‘राज यांचा प्रभाव नाहीच’ मतदानोत्तर चाचण्यांचे आकडे बाहेर येऊ लागले तसतसे भाजपचे प्रदेशपातळीवरील नेते माध्यमांकडे धाव घेऊ लागले. काल सायंकाळपासून आज दिवसभर भाजपचे मंत्री, पदाधिकारी यांनी माध्यमांवर आपली उपस्थिती लावली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवडणुकीत मोदीविरोधातील प्रचाराचा काहीच प्रभाव मतदारांवर पडला नसल्याचे छातीठोकपणे भाजपचे नेते सांगत होते.

मुंबई - सतराव्या लोकसभेचे सात टप्प्यांतील मतदान संपल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे कल भाजपच्या बाजूने वर्तविले जात आहेत. त्यामुळे खूषीत असलेल्या राज्य भाजपने या विजयाचे ‘सेलिब्रेशन’ करण्याचे ठरविले आहे.

प्रदेश कार्यालयात केक कापून आणि लाडू वाटून विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. भाजपचे माजी आमदार आणि विद्यमान नगरसेवक, भाजपचे प्रवक्‍ते अतुल शहा हे सीपी टॅंक येथे मुंबईत लाडू आणि केक कापून विजय साजरा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता. २३) होणार आहे. त्या दिवशी प्रदेश भाजप कार्यालयात मोठे एलईडी लावण्यात येणार आहेत. त्यावरून विविध वाहिन्यांचे प्रक्षेपण दाखविले जाणार आहे. तसेच, ढोलकी व अन्य वाद्ये वाजविण्यात येणार आहेत. फटाकेदेखील फोडण्यात येणार आहेत. सध्या ५०० किलो बुंदीचे लाडू बनविण्याचे सुरू आहे, असे शहा यांनी सांगितले. हा विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी कलाकारांनाही त्या दिवशी निमंत्रित करण्यात आले आहे.