Loksabha 2019 : मनोमिलनाचे मजल्यावर मजले

नाशिकमध्ये रविवारी झालेल्या युतीच्या मनोमिलन मेळाव्यातील छायाचित्र.
नाशिकमध्ये रविवारी झालेल्या युतीच्या मनोमिलन मेळाव्यातील छायाचित्र.

उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युती एकत्र आल्याच्या कितीही आणाभाका घेतल्या गेल्या, साक्षीपुरावे दिले गेले; तरी कार्यकर्तेच नव्हे तर नेते आणि इच्छुकांचे तरी मनोमिलन झाले का? हा खरा प्रश्‍न आहे. त्याचे पडसाद निवडणुकीचा बिगुल वाजला तरी सुरू असल्याने कोणाला दगाफटका आणि कोणाला मदतीचा हात मिळेल, हे सांगता येत नाही, अशी स्थिती आहे.

एकमेकांविरुद्ध मनसोक्‍त भांडल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात मनोमिलनाचे पर्व सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्या पर्वातील मोठा मेळावा रविवारी नाशिकमध्ये झाला. उत्तर महाराष्ट्रातील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी नाशिक वगळता उरलेले पाच मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्याने, या मनोमिलनाची अधिक गरज भाजपला आहे. तथापि, मेळावा झाला शिवसेनेच्या वाट्याच्या मतदारसंघात.

विशेषतः जळगाव आणि धुळे-मालेगाव या दोन मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद लक्षणीय आहे. तिकडे जालन्यात जसे अर्जुन खोतकरांनी, तसे इकडे नाशिकमध्ये माणिकराव कोकाटेंनी आपण लढणारच, अशी आरोळी ठोकली होती, तशीच घोषणा आणि तयारी पाचोऱ्याचे माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांनी जळगावसाठीही केली होती. खोतकरांप्रमाणे त्यांनीही तलवार म्यान केली असली, तरी कोकाटे अजून लढण्यावर ठाम आहेत.

त्यांची सगळी मदार मुख्यमंत्र्यांवर आहे. आर. ओ. तात्या रिंगणातून बाहेर पडले तरी भाजपसाठी सारे काही सुरळीत होईल, असे चित्र नाही. राष्ट्रवादीने माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपच्या उमेदवारीसाठी प्रकाश पाटील, उदय वाघ यांच्याऐवजी चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांचे नाव पुढे आले. परिणामी, महापालिका क्षेत्रातील उमेदवार नसण्याचा तोटा भाजपला आणि फायदा राष्ट्रवादीला होईल. 

प्रामाणिकतेची प्रमाणपत्रे
अर्थात, दोन्ही पक्षांचे नेते एकत्र आले म्हणून कार्यकर्त्यांचे मनोमिलन होईल, असे काही नाही. त्यासाठी वेळ लागेल आणि तेवढा वेळ मात्र उपलब्ध नाही.

उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्यांनी रविवारच्या मेळाव्यात, भांडलोही प्रामाणिकपणे आणि एकत्र आलोही प्रामाणिकपणे, असे सांगत एकमेकांना प्रामाणिकतेची प्रमाणपत्रे बहाल केली असली, तरी युतीपुढे मनोमिलनाचे आव्हान मोठे आहे. एखाद्या ऐतिहासिक वाड्यासारखी, जुन्या गढीच्या गूढ वास्तूसारखी ही मनोमिलनाची माडी आहे. तिचा पहिला मजला पक्षाच्या बड्या नेत्यांच्या मनोमिलनाचा, पुढचा मजला जिल्हा स्तरावरच्या नेत्यांचा, त्यापुढे दोन्ही पक्षांतर्गत गटबाजी संपवण्याचे मजले खूप आहेत.

नाशिकमधील शिवसेना महिनाभर त्याचा अनुभव घेत आहेच. विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे पक्षांतर्गत नाराजीचा, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी उमेदवारीसाठी दंड थोपटल्याचा अनुभव घेत आहेतच. शिवाय, फडणवीस- ठाकरे यांच्यातील जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे माणिकराव कोकाटे कधीही बाजी मारतील, ही अनामिक भीती दोन्ही गटांना आहेच. राष्ट्रवादीने माजी खासदार समीर भुजबळ यांची उमेदवारी जाहीर करून, रिंगणात थोरले भुजबळ की धाकटे या संभ्रमावर पडदा टाकला आहे. युतीच्या उमेदवारीचा फैसला मात्र व्हायचा आहे. 

नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमधील विद्यमान खासदारांपुढे उमेदवारी मिळविण्याचीच कसोटी आहे. दोन्ही पक्षांमध्येही अंतर्गत मनोमिलनाची मोठी गरज आहे. भारतीय जनता पक्षाचे दिंडोरीचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण हे तर हॅट्ट्रिक नोंदवलेले सलग तीनवेळचे खासदार. किंबहुना त्यामुळेच ते मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाचे दावेदार होते.

मंत्रिपद मिळाले नाहीच. शिवाय, आता तिकिटासाठी उंबरठे झिजवण्याची वेळ आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट ज्यांना हमखास मिळेल असे वाटत होते, त्या डॉ. भारती पवार यांच्याऐवजी माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे पुत्र, शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांना पक्षात आणून उमेदवारी दिली आहे. परिणामी, डॉ. भारती पवार भाजपच्या वाटेवर आहेत आणि त्यांच्याप्रती मतदारसंघात सहानुभूती असल्याचा फायदा भाजपला होईल, असे वाटणाऱ्यांची संख्या पक्षात मोठी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com