Loksabha 2019 : त्या उद्‌गारांमुळेच सुजय भाजपमध्ये

Radhakrishna-Vikhe-Patil
Radhakrishna-Vikhe-Patil

मुंबई - ‘स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे नगर जिल्ह्यात महत्त्व ते काय, असा उल्लेख करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १९९१ च्या निवडणुकीचे उल्लेख काढल्याने सुजय दुखावला अन्‌ त्याने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या दिवंगत वडिलांबद्दल असे उद्‌गार काढणे अयोग्य होते,’’ अशी खंत विधानसभेतील विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज व्यक्‍त केली. 

‘विखे घराण्याबाबत पवारांचे मत लक्षात घेत मी नगर जिल्ह्यात आघाडीच्या प्रचाराला जाणार नाही,’’ असेही ते म्हणाले. विखे-पाटील आपल्या मुलाच्या विरोधात प्रचार करणार नाहीत हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. ‘‘या संदर्भातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी दिल्लीत हायकमांडची भेट घेणार आहे. या घटनाक्रमाबद्दल ते जे सांगतील त्याप्रमाणे आपण वागू आणि भूमिका स्पष्ट करू,’’ असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘‘बाळासाहेब थोरात यांनी बादली, विमान अशा अनेक चिन्हांवर निवडणूक लढवली आहे. त्यामुळे त्यांनी पक्षनिष्ठेच्या गप्पा मला सांगू नयेत,’’ असेही ते म्हणाले.

डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आज काँग्रेस सांसदीय पक्षाच्या बैठकीला हजर होते. या बैठकीला प्रारंभ होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘नगरची जागा काँग्रेसला द्या, अशी विनंती आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे केली होती. याबद्दल सातत्याने पाठपुरावाही केला. मात्र त्यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात १९९१ मध्ये झालेल्या निवडणुकीचा उल्लेख करीत माझ्या दिवंगत वडिलांवर टीका केली. मृत्यू झाल्यानंतर अशी टीका करणे योग्य आहे काय? याचा तुम्हीच विचार करावा. मी तसेच सुजय यामुळे कमालीचे व्यथित झालो.’’

सुजय यांच्या निर्णयाचे हे समर्थन आहे काय? प्रत्यक्ष घरातच भाजपला समर्थन दिले जाते, तर जनतेचे काय, या प्रश्‍नांना त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. सुजय यांच्या विरोधात आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार काय? यावर त्यांनी, ‘‘मी नगरमध्ये जाणार नाही, माझ्या कुटुंबावर ज्या पक्षाचा विश्‍वास नाही तेथे मी जाऊन काय करू?’’ असेही ते म्हणाले. 
नगर जिल्ह्यातील अन्य एक नेते बाळासाहेब थोरात यांनी सुजय यांच्या निर्णयावर व्यक्‍त केलेल्या आक्षेपावर टीका करताना ते म्हणाले, ‘‘मला पक्षनिष्ठेच्या गोष्टी वेगवेगळ्या चिन्हांवर लढणाऱ्यांनी शिकवू नयेत. उद्या (ता. १५) दिल्लीत काँग्रेसच्या छाननी समितीच्या बैठकीसाठी विखे जाणार आहेत.

विरोधी पक्षनेतेपद जाईल 
विखे विरोधकांनी कितीही तलवारी परजल्या तरीही त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत मुलापाठोपाठ भाजपचा रस्ता पकडला, तर त्यांचे एक दोन निकटवर्तीय आमदारही राजीनामा देतील अशी शक्‍यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा केवळ एकने आमदारसंख्या जास्त असलेल्या काँग्रेसकडून त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद जाईल हे उघड असल्याने श्रेष्ठी सध्या कोणतीही कारवाई करणार नाहीत, असे सांगण्यात येते. मुंबईतील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर हेदेखील भाजपच्या मार्गावर आहेत.

ते काँग्रेसमध्ये, याचा आनंद - पवार 
दरम्यान, १९९१ च्या निवडणुकीचा दाखला देण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. ‘‘विखे अजून काँग्रेसमध्ये आहेत, याचा आनंद आहे,’’ अशी एका वाक्‍याची प्रतिक्रिया मात्र त्यांनी व्यक्‍त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com