Loksabha 2019 : ‘वंचित’चा उमेदवार जिंकणार नाही - रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

‘एनडीए’ला ३७० जागा मिळतील
बारामती मतदारसंघात परिवर्तन होणार असून, कांचन कुल निवडून येतील. गेल्या वेळी महादेव जानकरांनी कमळ चिन्ह घेतले असते, तर पवारांचा बुरूज ढासळला असता. महाराष्ट्रात महायुतीच्या ४० पेक्षा जास्त जागा निवडून येतील, तर देशभरात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) ३७० जागा मिळतील, असा अंदाज आठवले यांनी वर्तविला.

पुणे - वंचित बहुजन आघाडी म्हणजे किंचित आघाडी आहे. या निवडणुकीमध्ये त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा महायुतीलाच होईल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी केला. बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत करावी, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.  

महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात तिसरी आघाडी यशस्वी होत नाही. मी सगळ्या आघाड्यांमध्ये जाऊन आलेलो आहे. वंचित आघाडीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर किंचितही परिणाम होणार नाही. काळ्यापैशाला आळा घालण्यासाठी दहा वर्षांतून एकदा चलन बदलण्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुचविले होते. मोदी यांनी बाबासाहेबांच्या मार्गावर जात नोटाबंदी लागू केली.’’

Web Title: Loksabha Election 2019 Vanchit Bahujan Aghadi Candidate Ramdas Athawale Politics