Loksabha 2019 : पहिले मतदान जवानांना समर्पित करा - नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

शरदरावांना शोभा देत नाही
पाकिस्तानचीच भाषा काँग्रेसच्या घोषणापत्रात आहे. काँग्रेसकडून देशाला काहीही अपेक्षा नाहीत. अशांसोबत शरदराव तुम्ही उभे आहात. ज्यांना देशात दोन पंतप्रधान हवे आहेत; अशांसोबत तुम्ही आहात, हे तुम्हाला शोभा देणारे नाही, अशी टीका मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली.

औसा (जि. लातूर) - ‘पहिले मतदान हे तुमच्यासाठी ऐतिहासिक असून, ते पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांना, बालाकोटमध्ये हवाईहल्ला करणाऱ्या वीर जवानांना समर्पित करा. देशाच्या सुरक्षिततेसाठी, देश मजबूत करणासाठी मतदान करा. ते माझ्या खात्यावर जमा होणार आहे,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवमतदारांना केले. काँग्रेसवर त्यांनी टीकेची तोफही डागली.

लातूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे आणि उस्मानाबादमधील शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर आदी उपस्थित होते.

मोदी यांनी आपल्या ४१ मिनिटांच्या भाषणात काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘‘काँग्रेसला अक्कल असती, तर १९४७ मध्ये देशाचे विभाजन झाले नसते. पाकिस्तानची निर्मितीच झाली नसती. त्यामुळे काँग्रेसला बोलण्याचा अधिकारच राहिला नाही. ३७० कलम रद्द केले जाणार नाही, देशद्रोहाचा कायदा रद्द करण्यात येईल, असे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. अशा आश्‍वासनांतून देश सुरक्षित कसा राहील? पाकिस्तानचीच भाषा त्यांच्या जाहीरनाम्यात आहे. हवाईहल्ल्याचे पुरावे मागितले जात आहेत.

जवानांवर काँग्रेसचा विश्वास नाही; अशा काँग्रेसची अनामत जप्त करा.’’
नोकरी लागली किंवा दुकानातील पहिली कमाई आपण आईच्या चरणी ठेवतो, आराध्य देवाला किंवा लहान बहिणीला देतो. ही आपल्या देशाची परंपरा आहे. आता तुमचे पहिले मतदान ऐतिहासिक असेल. कारण, पहिले मतदान कुणाला केले, हे आयुष्यभर लक्षात राहते. ते जवानांना समर्पित करा. देशहितासाठी कमळ व धनुष्य-बाणासमोरील बटन दाबून मतदान करा. ते माझ्या खात्यात जमा होणार आहे, असे आवाहन मोदी यांनी नवमतदारांना केले.

ठाकरे परिवाराचे अनुकरण करा
मोदी यांनी आपल्या भाषणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवर्जून उल्लेख केला. या वेळी ते भावुकही झाले होते. बाळासाहेब ठाकरे यांचे नागरिकत्व काढून घेणे, त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेणारी ही काँग्रेस आहे. ठाकरे यांनी ठरविले असते, तर ते स्वतः किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते. पण, त्यांनी तसे केले नाही. हे परिवार असलेल्या पक्षांनी पाहावे, त्यांचा बोध घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

पणजोबा, आजी, वडील आणि आईने ‘गरिबी हटाव’चा नारा दिला होता. पण, देशातील गरिबी हटली नाही. आता राहुलबाबा तुम्ही काय खाऊन ‘गरिबी हटाव’चा नारा देत आहात? लोकांना मूर्ख बनवू नका.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मोदींनी ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावू, भटक्‍या समाजाला आर्थिक, सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे या समाजांसह वंचितांनी इकडे-तिकडे न जाता महायुतीसोबत राहावे.
- रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

क्षणचित्रे...
- युतीनंतर मोदी-उद्धव ठाकरेंची पहिलीच संयुक्त सभा
- ठाकरेंचा हात हाती घेत मोदींची व्यासपीठावर एंट्री
- ‘लहान बंधू’ अशा शब्दांत मोदींकडून ठाकरेंचा उल्लेख
- तळपत्या उन्हातही मोठी गर्दी

Web Title: Loksabha Election 2019 Voting Jawan Narendra Modi Politics