Loksabha 2019 : युतीसमोर आघाडीचे तगडे आव्हान!

Bhamare-Mahajan-Khadase
Bhamare-Mahajan-Khadase

खानदेश भाजप-शिवसेना युतीचा बालेकिल्ला आहे. या भागात दोन्हीही काँग्रेसला मानणारा वर्गही मोठा आहे. या वेळी काँग्रेस आघाडीनेही चांगलेच आव्हान उभे केले आहे. त्यामुळे खडसे-महाजन यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

खानदेशमधील चार लोकसभा मतदारसंघांमध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य आहे. खानदेश खास करून जळगावमधील लोकसभेच्या दोन्ही जागा म्हणजे भाजपचा बालेकिल्ला मानल्या जातात. पण हा बालेकिल्ला ढासळवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा जोरदार व्यूहरचना आखलेली आहे. त्यामुळे खानदेशातील भाजपच्या चार खासदारांचा आकडा एक किंवा दोनवर आल्यास आश्‍चर्य वाटायला नको, अशी स्थिती सध्या तरी आहे.

खानदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन खास दूत आहेत, पहिले गिरीश महाजन आणि दुसरे जयकुमार रावल. केंद्रातील नरेंद्र मोदींचे महत्त्वाचे दूत म्हणजे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे. भामरे यांच्यासाठी रावल उपयुक्त ठरणार आहेत. यंदा खानदेशच्या सगळ्या जागा निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर आहे. त्यामुळे खानदेशातील लोकसभा जागांची निवडणूक प्रतिष्ठेची आणि हायप्रोफाइल बनली आहे. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांचे तिकीट कापले जाण्याच्या चर्चेने सध्या जोर पकडला आहे. मात्र, अत्यंत चाणाक्ष असलेले मुख्यमंत्री फडणवीस सध्याच्या स्थितीत असे होऊ देणार नाहीत. रक्षा खडसे यांची रावेरमधून निवडून येण्याची क्षमता सर्वाधिक आहे. त्यामुळे ए प्लस असलेली ही जागा धोक्‍यात आणण्याएवढी त्यांची राजकीय समज कमी नक्कीच नाही. 

गुलाबराव देवकरांची आघाडी
जळगाव मतदारसंघात मात्र भाजपची कोंडी होताना दिसते. उमेदवारीवरून रस्सीखेच तर आहेच, पण राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना टक्कर देऊ शकेल, असा उमेदवार भाजपला काही केल्या सापडत नाही. कोणाच्या तरी गळ्यात उमेदवारीची माळ तर पडणारच, पण राष्ट्रवादीचे पारडे जळगावात नक्कीच जड दिसते. प्रचारात देवकर यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. सर्वांसाठी उपलब्ध आणि निगर्वी व्यक्तिमत्त्व म्हणून देवकर उजवे ठरण्याची शक्‍यता अधिक दिसते. देवकर वगळता खानदेशातील अन्य उमेदवारांकडून अधिकृत घोषणा होण्याची वाट सध्या पाहिली जात आहे.

धुळ्यात लढत चुरशीची
धुळ्याची जागादेखील भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी धुळ्यात सभाही घेतली. त्यामुळे भामरेंचे पारडे नक्कीच जड आहे. पण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही धुळ्यात सभा घेऊन महत्त्व अधोरेखित केले. काँग्रेसच्या गोटात उमेदवारीसाठी ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील आणि मालेगावचे डॉ. तुषार शेवाळे यांच्यात स्पर्धा आहे. तथापि, रोहिदास पाटील यांची उमेदवारी पक्की मानण्यात येते. 

रोहिदास पाटील समोर असल्यास डॉ. भामरे यांना यंदाची निवडणूक सोपी नक्कीच ठरणार नाही. गेल्या काही काळात रोहिदास पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघात केलेली बांधणी भाजपला अडचणीची ठरू शकते. मात्र, गेल्या काही काळात मार्गी लावलेल्या प्रकल्पांमुळे डॉ. भामरे आगेकूच करू शकतील. मतदारसंघातील मराठा फॅक्‍टर बाजी पलटवणारा ठरू शकतो. 
नंदुरबार मतदारसंघात डॉ. हीना गावित यांच्याबद्दल असलेली नाराजी संभाव्य उमेदवार ॲड. के. सी. पाडवी यांच्या पथ्यावर पडू शकते.

नंदुरबारमध्ये कधी नव्हे एवढ्या प्रमाणात काँग्रेसचे एकीकरण झालेले आहे. शिवाय धनगर समाजाला आदिवासींच्या कक्षेत आणण्याची रणनीती भाजपला नंदुरबारमध्ये महागात पडू शकते. यातून मार्ग काढण्यात हीना गावित यांची सर्वशक्ती पणाला लागणार आहे. त्यांना यंदा मार्ग सोपा नक्कीच नाही.

महाजन, खडसेंची भूमिका महत्त्वाची
या सगळ्यात कळीचा मुद्दा ठरणार तो म्हणजे, गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांची भूमिका. संकटमोचक आणि निवडणुकीचे तंत्र अचूक समजावून घेतलेले गिरीश महाजन यांच्याकडे खानदेशची जबाबदारी आहे.

एकनाथ खडसे यांना मानणारा मोठा वर्ग संपूर्ण खानदेशात आहे. कोअर कमिटीत खडसे यांच्यासोबत महाजन यांनाही आता सामावून घेण्यात आलेले आहे. रावेर लोकसभेसह खानदेशच्या तिन्ही लोकसभा जागांवर खडसे यांचा प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे. आत्तापर्यंत प्रभावी ठरलेले गिरीश महाजन यंदाही यशस्वी ठरतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. मात्र आघाडी धर्म काटेकोरपणे पाळल्यास युतीला घाम फोडण्यात खानदेश अग्रेसर राहू शकेल, असे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला अडचणीचा ठरणारा आणखी प्रभावी मुद्दा म्हणजे बहुजन वंचित आघाडी. या आघाडीचे उमेदवार कुठे-कुठे आणि कोण-कोण असतील, हे महत्त्वपूर्ण ठरू शकते. ते डॅमेज कंट्रोलची खबरदारी आघाडीला घ्यावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com