फडणवीसांनी जिंकला सामना

मुंबई - शिवसेना-भाजपने सोमवारी युती झाल्याचे जाहीर केले. यानंतर गळा भेट करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शहा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी उपस्थित होते.
मुंबई - शिवसेना-भाजपने सोमवारी युती झाल्याचे जाहीर केले. यानंतर गळा भेट करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शहा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी उपस्थित होते.

मुंबई - उत्तर प्रदेशखालोखाल जागा असलेल्या महाराष्ट्रात सहयोगी शिवसेनेला समवेत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती राखण्याचा सामना अखेर जिंकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरबारातले त्यांचे वजन यामुळे अधिकच वाढले असले तरी, विधानसभेत समान जागा, समान पद आणि समान जबाबदाऱ्या या फॉर्म्युल्यामुळे अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा शिवसेनेचा आग्रह मान्य झाला काय, अशी विचारणा सुरू आहे. मात्र, चर्चेचा तपशील माहीत असलेल्या भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने ज्याच्या जास्त जागा, त्याचाच मुख्यमंत्री असे सूत्र असेल, अशी माहिती दिली. 

शिवसेनेचे जनमानसातील स्थान काहीसे डळमळीत झाले असतानाही जास्त जागा निवडून आल्या तर त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे आश्‍वासनही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिळणे योग्य आहे काय, अशी विचारणा भाजपत सुरू आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देवेंद्र युतीचे समर्थक आहेत. शिवसेनेसाठी योग्य ते सगळे करण्याचे आश्‍वासन दिले आहे, मी त्यांना वेळप्रसंगी समजावेन, असे "मातोश्री'ला सांगितले असल्याचे शिवसेना वर्तुळात सांगितले जाते. 

शिवसेनेचे तब्बल दहा खासदार आणि 35 आमदार युतीचा आग्रह धरत होते. आज तो प्रत्यक्षात आला. नेतृत्वाचे मन वळवण्यात आम्ही यशस्वी ठरलो याचा आनंद असल्याचे एका शिवसेना नेत्याने सांगितले. भाजपत मात्र 2014 च्या विधानसभा युद्धात जे मिळवले ते तहात गमवावे लागल्याची भावना आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून पूर्वनिर्धारित मसुद्यानुसार युतीबाबत चर्चा सुरू होती. रामजन्मभूमीवरील मंदिर तसेच नाणार प्रकल्पाबद्दल फडणवीस यांनी समाधानकारक उत्तरे दिल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना दिली. शिवसेनेला महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळावे, नव्या विधानसभेत मुख्यमंत्री शिवसेनेचाही व्हावा, याबद्दल आपण बोलू, असे शहा यांनी शिवसेनेला सांगितले असल्याचा दावा करण्यात येतो. 

बाळासाहेबांच्या कक्षात... 
विदर्भाच्या दौऱ्याहून मुख्यमंत्री परत आल्यानंतर अमित शहा "मातोश्री'वर गेले. तेथे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या या दोन नेत्यांशी चर्चा केली. दिवसभरात भाजपने शिवसेनेला युतीतील जागावाटपाचे तीन पर्याय सुचवले होते. या पर्यायांवर चौघांनीही सर्वंकष चर्चा केली, असे सूत्रांनी सांगितले. या बैठकीनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कक्षात अमित शहांना नेण्यात आले. फडणवीस आणि ठाकरे पिता-पुत्रांनी हे भावनिक क्षण अनुभवले. साडेचार वर्षांपूर्वी शिवसेनेला समवेत घेण्यासाठी मोदी-शहा यांचे मन वळवण्यात यशस्वी झालेले फडणवीस पुन्हा एकदा शिवसेनेशी सुरू असलेला सामना जिंकले आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका नेत्याने व्यक्‍त केली.

'मन'से नव्हे "दिलसे'...! 
शिवसेना-भाजप युती व्यापक राष्ट्रहितासाठी "मनसे' एकत्र आल्याची टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर एकच हशा उसळला. त्यावर सावरत तुम्ही म्हणता ते "मनसे' नाही. "दिलसे', "हृदय'से असे ते म्हणाले. यावर उद्धव यांनी साफ मनाने, अशी कोटी केल्यानंतर पुन्हा हशा उसळला. 

किरिट सोमय्या निघून गेले 
पत्रकार परिषदेच्या अगोदर नेत्यांच्या पहिल्या रांगेत खासदार किरिट सोमय्या बसले होते. पण ज्यावेळी अमित शहा व ठाकरे पोचत आहेत, असे समजले तेव्हा सोमय्यांना उठण्यास सांगितले. शिवसेनेवर आगपाखड करण्यात सोमय्या आघाडीवर असल्याने उगीच समोर नको म्हणून त्यांना थेट निघून जाण्यास सांगितल्याची चर्चा सुरू झाली. सोमय्यादेखील पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच निघून गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com