Loksabha 2019 : बीडमध्ये सर्वाधिक ३६ उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या एकूण १७ लोकसभा मतदारसंघांपैकी बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३६ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.

मुंबई - पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या एकूण १७ लोकसभा मतदारसंघांपैकी बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३६ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. गडचिरोली-चिमूरमध्ये सर्वात कमी म्हणजे पाच उमेदवार रिंगणात आहेत. बीडमध्ये सर्वाधिक उमेदवार असल्याने येथे मतदानासाठी तीन बॅलेट युनिटचा वापर करण्यात येणार आहे.

उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्याने राज्यातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम अशा सात मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात नागपूरमध्ये सर्वाधिक म्हणजे ३० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश आहे. सर्वांत कमी म्हणजे पाच उमेदवार गडचिरोली-चिमूरमध्ये आमनेसामने उभे ठाकले आहेत. दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर अशा दहा मतदारसंघात १८ एप्रिलला मतदान होत आहे. या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या बीडमध्ये सर्वाधिक म्हणजे ३६ उमेदवार निवडणूक  रिंगणात आहेत.

Web Title: Most candidates in Beed in Loksabha election 2019