Loksabha 2019 : मोदींची येत्या सोमवारी उस्मानाबादमध्ये सभा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

नरेंद्र मोदी शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येत्या आठ तारखेला (सोमवार) उस्मानाबाद येथे जाहीर सभा घेणार आहेत.

मुंबई - राज्यातील भाजप-शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथून सुरवात केल्यानंतर मोदी शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येत्या आठ तारखेला (सोमवार) उस्मानाबाद येथे जाहीर सभा घेणार आहेत. युतीच्या जागावाटपात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना अशी थेट लढत आहे. शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर असून, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राणाजगजित सिंह हे आहेत. 

युतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राज्यात मोदी यांच्या सर्व टप्प्प्यांत 10-12 सभा होणार आहेत. यात त्यांनी वर्धा येथे पहिली जाहीर सभा घेतली. येथे भाजपचे रामदास तडस उमेदवार आहेत. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नव्हते. त्यामुळे मोदी राज्यात केवळ भाजपच्याच उमेदवारांचा प्रचार करणार का, असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चिला जात असताना मोदी यांची उस्मानाबाद येथे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सभा होणार आहे. या सभेने केवळ भाजपच्याच उमेदवारांचा प्रचार करणार आहेत, ही चर्चा फोल ठरली आहे. 

नांदेडमध्येही सभा 
नरेंद्र मोदी यांची येत्या शनिवारी नांदेड येथे जाहीर सभा होणार आहे. या ठिकाणी भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर हे उमेदवार असून, त्यांचा सामना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याशी होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत कॉंग्रेसच्या नांदेड आणि हिंगोली या दोनच जागा निवडून आल्या होत्या. 

Web Title: Narendra Modi meeting on Monday in Osmanabad