Loksabha 2019 :  संपूर्ण कर्जमुक्तीचे राष्ट्रवादीचे आश्‍वासन

Loksabha 2019 :  संपूर्ण कर्जमुक्तीचे राष्ट्रवादीचे आश्‍वासन

मुंबई - ‘आओ मिलके देश बनाये, हमारा आपका सबका भारत’ असे घोषवाक्‍य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रकाशित केला. शेतकरी, ग्रामविकास, शिक्षण, रोजगार निर्मितीवर यात भर देण्यात आला आहे. तसेच, सत्तेत आल्यावर राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्‍वासनही जाहीरनाम्यात दिले आहे.

राष्ट्रीय प्रश्‍नांसह शेतकरी, युवक व महिलांना केंद्रस्थानी ठेवून हा जाहीरानामा तयार करण्यात आल्याची माहिती जाहीरनामा समितीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी या वेळी दिली.

मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषेत प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कारभाराची पोलखोल करण्यात आली आहे. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने (यूपीए) केलेल्या कामांचा समावेश यामध्ये ठळकपणे करण्यात आला आहे. तर, भारतीय जनता पक्षाने २०१४ ला दिलेल्या आश्‍वासनानुसार भ्रष्टाचार समूळ नष्ट होण्याऐवजी भांडवलशहांशी केलेल्या मैत्रीचे नवेच रूप धारण केल्याचे दाखले देण्यात आले आहेत. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राफेल खरेदी व्यवहाराने देशाच्या विवेकबुद्धीला हादरे दिल्याची टीका दिलीप वळसे पाटील यांनी या वेळी केली.

‘‘पाच वर्षांत राजकीय हेतूने घटनात्मक स्वायत्त संस्थांची तोडफोड करण्यात आली आहे. शेती आणि शेतकऱ्यांवर हलाखीची परिस्थिती निर्माण केली आहे. अर्थव्यवस्थेचा मंदावलेला वेग, बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ, देशावरील कर्जात दुपटीने वाढ, परराष्ट्र धोरण भरकटले आहे. महागाई, वाढत्या किमती, नोटाबंदीच्या निर्णयाने शेतकऱ्यांची दुर्दशा झाली आहे. १४ वर्षांत बेरोजगारी ने नीचांक गाठला आहे. परिणामी, ४० कोटी तरुण बेकारीच्या खाईत लोटले आहेत. त्यामुळे देशातील शेतकरी प्रचंड नाऊमेद आणि निराश झाला आहे,’’ असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.

‘‘चार वर्षांत कृषिक्षेत्राच्या सरासरी वार्षिक जीडीपीतील वाढ फक्त २.५ टक्के आहे. वाढीचा हा दर यूपीए सरकारच्या शेवटच्या चार वर्षांत ५.२. टक्के इतका मंदावला आहे. कर्जबाजारीपणा, आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि शेतमालाला पुरेशी किंमत न मिळाल्याने शेतकरी समुदायावर कुऱ्हाड कोसळली आहे. राष्ट्रवादी कृषिक्षेत्र विकासाकडे, उत्पादकता, उत्पन्न आणि बाजारपेठेची उपलब्धता वाढविण्यासाठी पुरेसे लक्ष देणार आहे. शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी संरचनात्मक सुधारणा घडवून आणण्यात येईल शिवाय देशातील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिलीप वळसे पाटील यांनी या वेळी दिले.

जाहीरनाम्यातील आश्‍वासने
- आरोग्य, शिक्षण, पायाभूत सोयीसुविधा यांवर भर देणार
- कमी पाऊस पडणाऱ्या भागात शेतीसाठी ‘सिटू मॉइश्‍चर’ पद्धती राबविणार 
- अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणार
-  मुलींच्या शिक्षणासाठी छोट्या, मोठ्या शहरांमध्ये वसतिगृह उभारणार 
- अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक मुलीला शिक्षण मिळावे यासाठी दहावी, बारावी आणि पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींच्या कुटुंबीयांना विशेष लाभ देणार
-  शेती उत्पादनांवरील जीएसटी हटवणार
- पारंपरिक उद्योगांना चालना देणार
- कामगार कायद्यात सुधारणा करणार
- शहरी पदवीधर तरुणांना १०० दिवसांच्या नोकरीची हमी
- जागतिक दर्जाच्या क्रीडा विद्यापीठाची स्थापना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com