Loksabha 2019 : नेत्यांची कोटींची उड्डाणे! 

मंगळवार, 2 एप्रिल 2019

देशभर फिरण्यासाठी राजकीय नेत्यांनी हवाईमार्गाचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे विमान प्रवासाचा दर मोठ्या प्रमाणात वधारला आहे. देशभर फिरून पक्षाचा प्रचार करण्यासाठी नेते कोट्यवधींचा खर्च करत आहेत. 

मुंबई - गरिबांसाठी, सामान्यांसाठी लढणाऱ्या राजकीय नेत्यांकडून पक्षविचार देशभर पोहचवण्यासाठी आटापिटा सुरू आहे. त्यामुळे देशभर फिरण्यासाठी राजकीय नेत्यांनी हवाईमार्गाचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे विमान प्रवासाचा दर मोठ्या प्रमाणात वधारला आहे. देशभर फिरून पक्षाचा प्रचार करण्यासाठी नेते कोट्यवधींचा खर्च करत आहेत. 

हेलिकॉप्टरच्या वापरासाठी तासाला किमान एक लाख रुपये आकारले जात आहेत. विशेष विमानांसाठी हाच दर तब्बल चार लाखांपर्यंत पोहोचला आहे. निवडणुकांचे राज्यातील चार टप्पे लक्षात घेत राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हेलिकॉप्टर किंवा विशेष विमाने आरक्षित केली आहेत. राष्ट्रीय पक्षांनी विमानांचे अगोदरच आरक्षण केल्याने प्रादेशिक पक्षांना मात्र विमान प्रवासावेळी अडचणी निर्माण होत आहेत. भारतात साधारणत: 250 हेलिकॉप्टर वापरात आहेत. 100 विमानांचा वापर राजकीय नेत्यांकडून केला जातो. मुख्य आठ ते नऊ नेते चार्टर्ड विमाने वापरतात. या विशेष विमानांसाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाते. 

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विशेष विमानांचा वापर करतात; तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कॉंग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नेते हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. तर काही वेळा काही उद्योजकांच्या विमानांचाही वापर प्रवासासाठी करण्यात येतो. त्यावर निवडणुकीच्या काळात व्यावसायिक दर लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. अशा विमानांचा खर्च पक्षाच्या हिशेबात येत नसल्याने ही विमाने वापरणे सोयीचे होते. विशेष विमानातून हवाई प्रवास ही भारतात आता चैन राहिली नसून सामान्यत: 70 ते 80 हजार प्रतितास भाड्याने निवडणूक नसताना विमाने उपलब्ध असतात. 

दर्जा, व्यवस्थापनाकडे  कंपन्यांचे काटेकोर लक्ष 
निवडणुकीच्या काळात मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विमानांना वारंवार झालेले अपघात लक्षात घेता हवाई सुरक्षा हा सध्या कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने काही कठोर नियम केले आहेत. विमानांचा दर्जा तसेच व्यवस्थापन याकडे काटेकोर लक्ष पुरवले जात आहे, असे विमान वाहतूक क्षेत्रात काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या मंदार भारदे यांनी सांगितले. 

Web Title: Party leaders are to promote cost worth millions