Loksabha 2019 : बदललेली ‘शिवकुंडली’!

Loksabha 2019 :  बदललेली ‘शिवकुंडली’!

शिवसेनेच्या कुंडलीत १८ फेब्रुवारी २०१९ या दिवशी नेमके कोणते ग्रह जुळून आले होते, ते होरारत्नच सांगू शकतील! पण, त्याच्या चारच दिवस आधी पुलवामा येथे झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे अनेकांच्या कुंडल्यातील ग्रहांनी आपापल्या घरांची अदलाबदल केली होती. त्यामुळे त्याच दिवशी भविष्य बदललं ते शिवसेनेचं आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं राजकीय नेपथ्यही आरपार बदलून गेलं. त्या एका दिवशी घडलेल्या वेगवान घटनामालिकेमुळे गेली चार वर्षे सत्तेत राहूनही विरोधी पक्षांची भूमिका बजावणारी शिवसेना एका क्षणात खऱ्या अर्थाने ‘सत्ताधारी’ झाली आणि तेव्हाच महाराष्ट्रात होऊ घातलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीत मनातल्या मनात का होईना जल्लोष साजरा होत होता. 

त्याच दिवशी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत आता या नव्या ‘शिवबंधना’मुळे ‘युती’ कशी मजबूत झाली आहे, ते सांगितलं जात होतं, तर त्याच वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात थेट मतदान होणार म्हणून आनंद साजरा करीत होते!

गेली लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेच्या गळ्यात गळा घालून लढवली आणि त्यात मिळालेल्या मोठ्या यशानंतर ‘शतप्रतिशत भाजप’चं जुनं-पुराणं स्वप्न साकार करण्याची हीच ती वेळ, असं गृहीत धरून पुढच्या चारच महिन्यांत विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यावर शिवसेनेला काडीमोड दिला. मात्र, त्यानंतरही उद्धव ठाकरे डगमगले नाहीत. त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आणि केवळ भाजपच नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवविर्माण सेना या चार पक्षांशी कडवी झुंज देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ६३ आमदार स्वत:च्या बलबुत्यावर निवडून आणले होते आणि साहजिकच विरोधी पक्षांची लाल दिव्याची गाडीही मिळवली होती. 

त्यानंतरच्या महिनाभरातच त्याच लाल दिव्याच्या गाडीत बसून शिवसेना विधानसभेतील सत्ताधारी बाकांवर जाऊन बसली! त्यानंतर आपल्या गळास लागलेल्या शिवसेनेला भाजपने गेली चार वर्षे अत्यंत अपमानास्पद पद्धतीने वागवले  आणि त्याचा बदला उद्धव ठाकरे हे रोजच्या रोज आपल्याच सरकारची ‘भाजपचे सरकार’ अशी संभावना करीत, त्यांच्यावर घणाघाती घाव  घालत राहिले. मात्र, १८ फेब्रुवारी या एकाच दिवशीच्या ग्रहगोलांनी त्या आक्रमकतेवर पाणी ओतलं आणि आता उद्धव मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून, ‘आता मला सरकारची चांगली कामं दिसू लागली आहेत!’ असं सांगू लागले.

‘युती’चा प्रचार मनोरंजक ठरणार
भाजप-शिवसेना युती झाल्यामुळे दोन्ही पक्षांचे इच्छुक उमेदवार खुशीत आले आहेत खरे; पण त्याच वेळी आता प्रचाराचा धूमधडाका सुरू होईल तेव्हा मतदारच नव्हे, तर शिवसैनिकही नेमक्‍या कोणत्या म्हणजे सरकारवर असूड ओढणाऱ्या उद्धव यांच्यावर विश्‍वास दर्शवणार की सरकारची महाआरती गाणाऱ्या, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अर्थात, त्या प्रश्‍नाचे उत्तर आपल्याला निकालांनंतरच मिळणार असले, तरी शिवसेनेच्या डबल-ढोलकी भूमिकेमुळे ‘युती’चा प्रचार मोठाच मनोरंजक ठरणार, यात मात्र शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com